'साठी'मुळे दानवे युतीबाबत सकारात्मक - उद्धव ठाकरेंचा टोला

By admin | Published: January 25, 2017 07:27 AM2017-01-25T07:27:51+5:302017-01-25T07:33:49+5:30

'सामना'च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी रावसाहेब दानवेंवर टीकास्त्र सोडले आहे..

Things are positive for the charity 'Uddhav' - Uddhav Thackeray | 'साठी'मुळे दानवे युतीबाबत सकारात्मक - उद्धव ठाकरेंचा टोला

'साठी'मुळे दानवे युतीबाबत सकारात्मक - उद्धव ठाकरेंचा टोला

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा-शिवसेनेची युती आता व्हेंटिलेटरवर गेली असली तरी भाजपा नेते युतीबाबत अद्याप सकारात्मक आहेत. याच मुद्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 'सामना'तून खडे बोल सुनावले आहेत. तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावरही टीका केली असून वयाच्या 'साठी'मुळेच दानवेंना  सकारात्मक विचार सुचत आहेत, असा टोला हाणला आहे. लाखो शिवसैनिक हीच आमची ताकद आहे व त्यांच्या बळावर आम्ही कोणतीही अटीतटीची लढाई लढायला सज्ज आहोत, असे नमूद करत त्यांनी अप्रत्यक्षरित्या 'स्वबळावर' लढण्याचा इशारा दिला. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात ?
-  मुंबईसह दहा महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू  झाली आहे. आघाडय़ा बनत आहेत आणि आघाडय़ा तुटतही आहेत. आयाराम-गयारामांचाही धुरळा उडू लागला आहे. पण सर्वच राजकीय पोंगापंडितांचे लक्ष लागले आहे ते मुंबईत काय होणार? युतीचे कसे होणार? हे सर्व विषय हिंदुस्थानच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजे २६ जानेवारीस आम्ही मार्गी लावू. १९४७ साली देश स्वतंत्र झाला असला तरी हिंदुस्थान नामक भूमी ‘प्रजासत्ताक’ देश खऱया अर्थाने बनला तो २६ जानेवारी १९५० रोजी. या दिवसापासून देशाला स्वतःची घटना, कायदे-कानून मिळाले. नवे अस्तित्व, नवी झेप मिळाली. हिंदुस्थान हे खऱया अर्थाने Republic State म्हणजे प्रजासत्ताक राज्य बनले. त्यामुळे प्रजासत्ताक दिनीच आम्ही फैसला करणार आहोत. लाखो शिवसैनिक हीच आमची ताकद आहे व त्यांच्या बळावर आम्ही कोणतीही अटीतटीची लढाई लढायला सज्ज आहोत, हे आम्ही अगदी विनम्र भावाने येथे नमूद करीत आहोत. सत्तेचा माज आम्हाला कधीच नव्हता. कारण शेवटी जनताच सत्ता देत असते व ज्यांना त्या सत्तेचा माज चढतो अशांचा माज उतरवून त्यांना धुळीस मिळविण्याचे कार्यही सार्वभौम जनताच करीत असते. अशा जनतेसमोर आम्ही सदैव नतमस्तक आहोत. 
 
- शिवसेना-भाजप युतीचे काय होणार व कसे होणार, या प्रश्नाने ज्यांना आज ग्रासले आहे त्यांना आम्ही रावसाहेब दानवे यांच्या एका विनम्र विधानाचा दाखला देऊन श्रद्धा व सबुरीचा मंत्र देत आहोत. श्री. दानवे यांनी असे नम्रपणे जाहीर केले आहे की, ‘‘मुंबईसह राज्यात शिवसेनेसोबत युती करण्याबाबत आम्ही अजून सकारात्मक आहोत. शेवटपर्यंत आमचे प्रयत्न सुरू आहेत!’’ दानवे यांच्या तोंडात साखर पडो. दानवेंसारखे लोक राजकारणात आहेत म्हणून बऱ्याच गोष्टी चांगल्या चालल्या आहेत. दानवे यांची सकारात्मक आणि आश्वासक भूमिका पाहून ‘युती’वाद्यांना नक्कीच तजेला येईल. दानवे हे सकारात्मक आहेत. त्यामुळे कोणत्याही कठीण प्रसंगातून मार्ग ते काढतील व सगळय़ांचीच वाकडी तोंडे वळवून युतीत हास्य निर्माण करतील. रावसाहेब दानवे यांच्या सकारात्मक भूमिकांनी सध्या महाराष्ट्राच्या समाजमनात खळबळ उडवून दिली आहे. ‘निवडणुकीच्या आदल्या दिवशी दारात आलेली लक्ष्मी परत पाठवू नका. लक्ष्मीदर्शन घ्या’ असे लोकांना पटवून देणे हे तर सकारात्मक सज्जन प्रवृत्तीचेच लक्षण आहे. व ‘नोटाबंदी’वर त्यांनी जनतेला दिलेला हा रामबाण उपाय आहे. दानवे यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. दानवे यांनी कालच सांगितले की, ‘‘लोक हो, चिंता कसली करता? बँकांच्या रांगेत चेंगरून काहो मरता? मैं हूं ना. हजार-पाचशेच्या नोटा मी देतो तुम्हाला बदलून!’’ नोटाबंदीवर इतके जालीम मलम लोकांना कोणीच लावले नसेल. दानवे यांची ही सकारात्मक सक्रियताच भाजपला दीपस्तंभाप्रमाणे मार्ग दाखवीत राहील. म्हणूनच युतीबाबत ते आश्वासक, सकारात्मक व इतर बरेच काही असल्याबद्दल आमचीही चिंता मिटली आहे. 
 
- राजकारणात, समाजकारणात खूप माणसे भेटतात. वाऱयाच्या झुळकाप्रमाणे येतात आणि जातात. पण काही माणसे अशी असतात जी समाजाला जीवनाचा अर्थ सांगतात. सकारात्मक दृष्टी देऊन जीवनात गोडवा आणतात. दानवे हे त्यातलेच दिसतात. दानवे यांचे वय ‘साठ’ असावे व त्यामुळेच त्यांना हे सकारात्मक विचार सुचत आहेत. आम्ही दानवे यांचे आभार मानतो. दानवे यांनी युतीला सकारात्मक मार्ग दाखवले! त्यांचे अभिनंदन.

Web Title: Things are positive for the charity 'Uddhav' - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.