चर्चेच्या पुढे जाऊन विचार करावा - प्रियंका चतुर्वेदी
By admin | Published: June 3, 2016 11:09 PM2016-06-03T23:09:39+5:302016-06-03T23:09:39+5:30
भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध सकारात्मकतेवर आधारित हवेत. दोन्ही देशांमधील चर्चा प्रक्रिया सुरू करण्याची आवश्यकता तर आहेच. परंतु गेल्या ६९ वर्षांपासून केवळ चर्चाच सुरू आहे.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि . 3 - भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध सकारात्मकतेवर आधारित हवेत. दोन्ही देशांमधील चर्चा प्रक्रिया सुरू करण्याची आवश्यकता तर आहेच. परंतु गेल्या ६९ वर्षांपासून केवळ चर्चाच सुरू आहे. आता त्याहून पुढे जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे, असे मत काँग्रेसच्या प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले.
चर्चेपलीकडे जाऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु अनेकदा राजकीय इच्छाशक्ती कमी पडते. त्यामुळेच चर्चेसंबंधात दोन पावले समोर टाकल्यानंतर काही काळातच चार पावले मागे घ्यावी लागतात. गेल्या ६९ वर्षांत दोन्ही देशांमध्ये कटू प्रसंगच जास्त दिसून आले. भारत व पाकिस्तानदरम्यान संवादाचा कुठलाही सामान्य आधार नाही. दोन्ही देशांतील लोकांचे काही बाबतीत विचार भिन्न आहेत. त्यामुळे त्यांच्यात संवाद वाढणे आवश्यक आहे. जनतेमधील संवाद वाढविण्यासाठी हिंदी चित्रपट, संस्कृती यांचा उपयोग होऊ शकतो. सोबतच दोन्ही देशांच्या सैन्यातदेखील चर्चा झाली पाहिजे, असे चतुर्वेदी म्हणाल्या.
दोन्ही देशांमध्ये प्रसारमाध्यमांचे महत्त्व आहे. त्यांचेदेखील आदानप्रदान व्हायला हवे. देश प्रगतीकडे पावले टाकत आहे. त्यामुळे अशा स्थितीत इतिहास दूर सारून नवी सुरुवात करण्याची आवश्यकता आहे. दोन्ही देशांमधील संबंधांचे धोरण प्रसारमाध्यमांमधील चर्चांच्या आधारावर तयार व्हायला नको. दोन्ही देशांमध्ये भविष्यात नवीन सुरुवात व्हावी अशीच देशातील इतर तरुणांप्रमाणेच माझीदेखील अपेक्षा आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.