परिवर्तनवादी विचारांचा सामना विचारांनी करा
By admin | Published: February 17, 2015 01:18 AM2015-02-17T01:18:38+5:302015-02-17T01:18:38+5:30
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हल्लेखोरांना अद्याप पकडण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. असे असताना कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर प्राणघातक हल्ला होतो,
सामाजिक कार्यकर्त्यांचे आव्हान : कॉ. गोविंद पानसरे व उमा पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हल्लेखोरांना अद्याप पकडण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. असे असताना कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर प्राणघातक हल्ला होतो, ही बाब म्हणजे देशात फॅसिस्ट शक्ती मोठ्या प्रमाणात काम करीत असून, लोकशाही देशात हुकूमशाही पद्धतीने सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. हिंमत असेल, तर विचारांचा सामना विचारांनी करण्यासाठी समोरासमोर या, माणूस मारून त्यांचा विचार संपविता येत नाही, अशा तीव्र शब्दांत अनेक परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी फॅसिस्ट आणि धर्मांध शक्तींना आव्हान दिले.
कॉ. गोविंद पानसरे आणि उमाताई पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर निषेध करण्यात आला. त्या वेळी झालेल्या सभेत अनेक कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध करून या प्रकारामागील शक्तींचा तातडीने तपास करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
आम आदमी पार्टी, लोकायत, भारिप-बहुजन महासंघ, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मनपा कामगार युनियन, संभाजी ब्रिगेड, हमाल पंचायत, छावा युवा संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, राष्ट्र सेवा दल, मुक्तिवादी युवा संघटना, श्रमिक मुक्ती दल, सत्यशोधक जनआंदोलन , सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, एसएफआय, दलित, आदिवासी विकास आंदोलन, धर्मनिरपेक्ष पुरोगामी संघटना कृती समिती, स्त्रीमुक्ती आंदोलन, जनवादी महिला संघटना, जनमुक्ती संघर्ष वाहिनी, जनता दल, इंटक आदी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यात प्रा. सुभाष वारे, विद्या बाळ, रजिया पटेल, अजित अभ्यंकर, शांता रानडे, सुहास कोल्हेकर, अलका जोशी, मिलिंद देशमुख, म. ना. कांबळे, किरण मोघे, विठ्ठल सातव, एम. पी. गाडेकर, किशोर ढमाले, आमदार दीप्ती चवधरी, डॉ. संजय दाभाडे, मनीषा गुुप्ते, प्रताप गुरव, किरण कदम, सुनीती सु. र., अशोक धिवरे, प्रा. नितीश नवसागरे, सुषमा अंधारे, डॉ. सिद्धार्थ धेंडे, नीरज जैन, मुक्ता मनोहर, हाजीभाई नदाफ यांनी सहभाग घेतला. जोर जुल्म की टक्कर मे, संघर्ष हमारा नारा है... म्हणत तरुण-तरुणी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभा
४पुरोगामी महाराष्ट्रात कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. गोंविद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ विविध संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध सभा घेण्यात आली. या वेळी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळांने जिल्हाधिकारी सौरभ राव यांना निवेदन दिले.
४आम्ही सारे पानसरे... हिटलरशाहीचा निषेध असो... गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांचा निषेध... अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले. तसेच अनेक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांनी येथे तीव्र भावना व्यक्त केल्या. दरम्यान, येत्या १९ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता मंडईतून शिवजयंतीनिमित्त रॅली काढून हल्ल्याचा निषेध करण्यात येणार असल्याचे अभ्यंकर यांनी सांगितले. तसेच या वेळी गोंविद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे स्क्रीनिंग करण्यात येणार आहे.
राज्य शासनाचे अपयश
संविधानातील मूल्यांसाठी सतत प्रबोधन करणाऱ्या गोविंंद पानसरे यांच्यावरील हल्ला म्हणजे विवेकावरील हल्ला आहे. हा हल्ला म्हणजे राज्य शासनाचे अपयश आहेच, सरकारला समर्थन देणाऱ्या सनातनी प्रवृत्तींच्या कारवायांचा अप्रत्यक्ष परिणामही आहे, अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाच्या मीडिया सेलने व्यक्त केली आहे. सेलचे प्रवक्ते तन्मय कानिटकर म्हणाले, ‘‘सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यात असमर्थ ठरल्याने गुन्हेगारांना बळ मिळत आहे.’’
सर्व स्तरांतून निषेध
नॅशनल मुस्लिम फ्रंटच्या वतीने कॉ. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. शिवसंग्राम संस्थेच्या वतीने हल्लेखोरांच्या तालिबानी वृत्तीचा तीव्र निषेध करण्यात आला. एस. एम. जोशी फाऊंडेशन नानासाहेब गोरे अकादमीतर्फेही निषेध करण्यात आला. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हल्ल्याचा निषेध करण्यात आला. संबंंिधतांवर कडक कारवाई करण्याची मागणी शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी केली.
प्रतिगामी शक्तीला धक्का लावणार का?
कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर झालेला हल्ल्याचा प्रकार हा निषेधार्ह आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना याच मार्गाने मारण्यात आले. सनातनी शक्ती संघटित होत आहेत. शासनकर्ते या शक्तीला धक्का लावणार का, हाच प्रश्न माझ्या मनात आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे. बेळगाव सीमाप्रश्न आणि कोल्हापूर टोलनाक्याच्या प्रश्नांमध्ये त्यांचा सहभाग होता. समाजात फोफावत चाललेल्या सनातनी शक्तीचा जनतेने मुकाबला केला पाहिजे. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी डॉ. दाभोलकरांच्या खुनाची जबाबदारी स्वीकारली नाही. डॉ. दाभोलकर खुनाचा तपास त्वरित झाला पाहिजे आणि पानसरे यांचेही हल्लेखोर सापडले पाहिजेत.
- बाबा आढाव (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते)
सरकारने महाराष्ट्रात धर्मांध शक्ती मोकाट सोडल्या आहेत. त्यामुळे जे कोणी त्यांच्या विरोधात विचार मांडेल त्यांना गोळ्या घालायच्या, असा प्रकार सुरू आहे. पुरोगामी शक्तींना यापुढे प्रचंड आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. पण या आव्हानांना तोंड देण्यासाठी पुरोगामी शक्ती तयार आहेत. यातूनच नेते आणि कार्यकर्त्यांची फळी तयार होणार आहे.
- अजित अभ्यंकर (ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते)
पानसरे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा युक्रांदतर्फे जाहीर निषेध. गोविंद पानसरे हे नेवासेचे शिक्षक, वकील आणि गांधीवादी कम्युनिस्ट आहेत. कोल्हापूरमधील श्रमिकवर्गाचा ते आधार आहेत. सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर येथील फार मोठा कामगारवर्ग त्यांच्या मागे आहे. डॉ. दाभोलकरांचे खुनी सरकारला पकडता आले नाहीत. आता दोन्ही विचारवंतांचे आरोपी शोधून काढणे तसेच सुदृढ लोकशाहीला मारक ठरणाऱ्या शक्ती कोणत्या आहेत, त्याचा शोध घेणे ही शासनाची जबाबदारी आहे.
- कुमार सप्तर्षी (युक्रांदचे अध्यक्ष)
देशातल्या आणि राज्यातल्या नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळे पुरोगामी महाराष्ट्रात असे प्रकार घडत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्याबाबतीतही प्रमुख नेत्यांनी असंवेदनशीलता दाखविली. त्यातूनच या शक्तींना बळ मिळून असे प्रकार घडत आहेत. त्याविरोधात पुरोगामी शक्तींनी एकत्र आले पाहिजे आणि ताकदीने काम केले पाहिजे.
- विनोद शिरसाठ
धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही मूल्ये यांच्यासाठी उभी हयात घालविलेल्या नेते, कार्यकर्त्यांवर हल्ले होणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी वेळीच पकडले असते तर पानसरे यांच्यावरील हल्ला टाळता आला असता. दाभोलकर आणि पानसरे यांच्यावरील हल्ल्यामध्ये अनेक साम्यस्थळे आहेत. असे हल्ले थांबवायचे असतील तर हल्लेखोरांना तातडीने पकडण्याची आवश्यकता आहे.
- हमीद दाभोलकर
सनातनी शक्तींमध्ये हिंमत वाढत आहे. केंद्रात आणि राज्यात त्यांचेच सरकार आहे. त्यामुळे या शक्ती सोकावल्या आहेत. डॉ. दाभोलकरांचे खुनीही सापडले आहेत. हल्लेखोरांचा लवकरात लवकर सरकारने शोध घेतला पाहिजे.
- किरण मोघे (कम्युनिस्ट नेत्या)
आजच्या स्थितीत समाजात होणारा हा एकमेव हल्ला नाही. धर्माच्या नावाखाली लोकांमध्ये फूट पाडली जात आहे. जे व्यक्ती धर्माच्याविरोधात बोलत आहेत, त्यांनाच संपवण्याचा घाट घातला जात आहे. यासाठी आता हिंदंूनी संघटित होण्याची गरज आहे.
- मनीषा गुप्ते
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासारखाच हल्ला कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर झाला आहे. या हल्याचा अंनिस निषेध व्यक्त करीत आहे. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळत नाही, त्यांचे चेहरे अस्पष्ट दिसत आहेत, असे सांगितले जात आहे, याचा अर्थ त्यांना तपासच नीट करायचा नाही. आमच्या शिष्टमंडळाने काल दिल्लीत नेत्यांची भेट घेतली, तिथे जाऊन या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.
- मिलिंद देशमुख ( राज्य सचिव, अंधश्रद्धा निर्मूलन समिती)
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासारखा तरूण निष्ठेचा कार्यकर्ता गेला, पण त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा तपास लागेल का नाही, याबद्दल मनात साशंकताच आहे. विवेकवादाला विरोध करणाऱ्या शक्तींचेच समूळ उच्चाटन केले पाहिजे.
- विद्या बाळ ( ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या)
अभिव्यक्तीस्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे. प्रत्येकाला मत मांडण्याची संधी देणे ही आपली धर्म आणि संस्कृती आहे. पण जो आमच्याविरूद्ध बोलेल ते गोळ्या खातील, अशी आताची परिस्थिती आहे.
- रझिया पटेल ( सामाजिक कार्यकर्त्या)
कॉ. पानसरे हे गरीब-श्रमिकांचे नेते, खरे तर आधारवड आहेत. ते सामान्य माणसाचा आवाज आहेत. पुरोगामी चळवळीचाच नव्हे; तर संपूर्ण समाजाचाच एक नैतिक मानबिंदू आहेत. अत्यंत अभ्यासू, संयमी तरीही कणखर, स्पष्टवक्ते आणि गरीब-श्रमिकांच्या हक्कासाठी कटिबद्ध असलेल्या कॉ. गोविंदराव पानसरे यांच्यावरचा हल्ला हा समाजातील सत्शक्तीवरचाच हल्ला आहे.
- सुनीती सु. र. (राष्ट्रीय जनसेवा आंदोलन)