नवभारत निर्मितीचा विचार करा
By Admin | Published: February 25, 2017 05:05 AM2017-02-25T05:05:27+5:302017-02-25T05:05:27+5:30
भविष्यातील नवभारताच्या निर्मितीसाठी गांभीर्यपूर्वक विचार करून नवसंशोधन, तंत्रज्ञान अशा आवश्यक बाबींचा वेध घेऊन त्याअनुषंगाने आपली भूमिका
कोल्हापूर : भविष्यातील नवभारताच्या निर्मितीसाठी गांभीर्यपूर्वक विचार करून नवसंशोधन, तंत्रज्ञान अशा आवश्यक बाबींचा वेध घेऊन त्याअनुषंगाने आपली भूमिका, कार्यशैली युवावर्गाने ठरवावी, असे आवाहन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी शुक्रवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या ५३ व्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. यावेळी कोल्हापुरातील सोनाली बेकनाळकर या विद्यार्थिनीला राष्ट्रपती सुवर्णपदक तर साताऱ्यातील स्नेहल चव्हाण हिला ‘कुलपती पदक’ देऊन गौरविण्यात आले. शानदार, उत्साही वातावरणात पार पडलेल्या या दीक्षान्त समारंभात ४९ हजार ९५१ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. डॉ. काकोडकर म्हणाले, की जगाच्या सर्वांगीण विकासासाठी कसे योगदान देता येईल, याचा विचार युवा वर्गाने करावा. या विकासाच्या ध्येयपूर्तीसाठी देश, समाज, उद्योग आदींच्या पलीकडे जावून कार्यरत राहावे. उच्चशिक्षणातील बदलती क्षितिजे काबीज करण्यासाठी त्यांनी तत्पर राहावे. उच्चशिक्षणाच्या पद्धतीमध्ये समाजाच्या विकासासह वृद्धीची क्षमता आहे. त्याला गती देण्यासाठी बहुस्तरीय अध्ययन प्रणाली विकसित करण्याची गरज आहे. देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील कौटुंबिक उत्पन्न, भूमीहीनता आदींमुळे निर्माण झालेली दरी सांधण्याची क्षमता संशोधन, विकास क्षेत्रात आहे. आपल्या देशात नवनवीन संशोधन वाढत आहे, त्याचे तंत्रज्ञानात रूपांतर करून उद्योग क्षेत्रात ते आणणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)