नवभारत निर्मितीचा गांभीर्याने विचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2017 01:09 AM2017-02-25T01:09:31+5:302017-02-25T01:09:31+5:30

अनिल काकोडकर : शिवाजी विद्यापीठाच्या ५३ व्या दीक्षान्त समारंभात सोनाली बेकनाळकर, स्नेहल चव्हाण यांचा गौरव

Think seriously about the creation of Navbharat | नवभारत निर्मितीचा गांभीर्याने विचार करा

नवभारत निर्मितीचा गांभीर्याने विचार करा

Next

कोल्हापूर : भविष्यातील नवभारताच्या निर्मितीसाठी गांभीर्यपूर्वक विचार करून नवसंशोधन, तंत्रज्ञान अशा आवश्यक बाबींचा वेध घेऊन त्याअनुषंगाने आपली भूमिका, कार्यशैली युवावर्गाने ठरवावी, असे आवाहन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी शुक्रवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या ५३ व्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. विद्यापीठातील लोककला केंद्रातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. यावेळी डॉ. काकोडकर यांच्या हस्ते कोल्हापुरातील सोनाली बेकनाळकर या विद्यार्थिनीला सन २०१५-१६ मध्ये कला, क्रीडा, बौद्धिक या क्षेत्रांसह एनसीसी, एनएसएस यांतील गुणवत्ताप्राप्त तसेच व्यक्तिमत्त्व, वर्तणूक व नेतृत्वगुण याबाबतचे विद्यापीठाचे सर्वसाधारण कौशल्यासाठीचे राष्ट्रपती सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते साताऱ्यातील स्नेहल चव्हाण हिला एम. ए. संस्कृत विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल ‘कुलपती पदक’ देऊन गौरविण्यात आले. शानदार, उत्साही वातावरणात पार पडलेल्या या दीक्षान्त समारंभात ४९ हजार ९५१ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.
डॉ. काकोडकर म्हणाले, जगाच्या सर्वांगीण विकासासाठी कसे योगदान देता येईल याचा विचार युवा वर्गाने करावा. या विकासाच्या ध्येयपूर्तीसाठी देश, समाज, उद्योग आदींच्या पलीकडे जाऊन कार्यरत राहावे. उच्चशिक्षणातील बदलती क्षितिजे काबीज करण्यासाठी त्यांनी तत्पर राहावे.
कार्यक्रमात कुलगुरू डॉ. शिंदे यांनी वार्षिक अहवाल सादर केला तसेच पत्रकारिता विभागातील ग. गो. जाधव अध्यासन स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ते म्हणाले, नव्या जगात व युगात पदवीधर यापुढे प्रवेश करणार आहेत. हे नवे जग वेगवान, जागतिक स्पर्धेचे आहे. त्यात टिकून राहण्यासाठी पदवीसह जीवन आणि तंत्रकौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी दुपारी अडीचच्या सुमारास परीक्षा नियंत्रक महेश काकडे हे दीक्षान्त मिरवणुकीने ज्ञानदंड घेऊन कार्यक्रमस्थळी आले. कार्यक्रमास ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ डॉ. शिवराम भोजे, माजी कुलगुरु डॉ. एस. एच. पवार, प्रा. एन. व्ही. नलवडे, शिरीष पवार, आर. नारायणा, पी. एस. पाटणकर, एस. एच. सावंत, पी. एस. पाटील, प्राचार्य हिंदुराव पाटील, डॉ. रूपा शहा, उदय गायकवाड, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, आदी उपस्थित होते. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी पदव्यांचे वाचन केले. आलोक जत्राटकर, आदित्य मैंदर्गीकर, नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)


ग्रामीण विकासाचा सुधारित आराखडा
उत्पादकतेच्या जोरावर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांचे उत्पन्न शहरी भागाच्या निम्मे असल्याचे डॉ. काकोडकर यांनी सांगितले. ते म्हणाले, अर्थव्यवस्थेमध्ये मोठे योगदान असणाऱ्या ग्रामीण कुटुंबांपैकी केवळ ९.७ टक्के कुटुंबांना नियमित वेतन मिळते; तर ५६ टक्के नागरिक भूमिहीन आहेत. जगण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. हे चित्र बदलण्यासाठी ग्रामीण विकासाचा सुधारित प्रारूप आराखडा तयार करावा लागेल. ग्रामीण, दुर्गम भागांतील नागरिकांच्या गरजा भागविण्यासाठी कमी खर्चात उच्च दर्जाचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आपल्या देशासह इतर विकसनशील राष्ट्रांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

डॉ. काकोडकर म्हणाले...नवउद्योजकता निर्माण करणारी पिढी शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांनी घडवावी.
युवकांनी रोजगार मागणारे नको, तर रोजगार निर्माते बनावे.
उच्च शिक्षणातील अध्ययन प्रक्रियेत संशोधनाला पूरक वातावरण, दर्जेदार कौशल्यनिर्मिती, मूलभूत मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी पोषक वातावरणाचा अभाव
तंत्रज्ञानासाठी आपल्याला अन्य देशांवर अवलंबून राहावे लागते. ते अवलंबित्व कमी करणे आवश्यक आहे.



क्षणचित्रे
२२ हजार ३३७ स्नातकांनी स्वीकारली प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी.
विविध विद्याशाखांतील एकूण २५८ संशोधक विद्यार्थिनींना पीएच. डी. व एम. फिल. पदवी प्रदान.
विविध गुणवत्ताप्राप्त ८७ विद्यार्थ्यांचा व्यासपीठावर पारितोषिके देऊन सन्मान.
दीक्षान्त समारंभाचे थेट प्रक्षेपण.

Web Title: Think seriously about the creation of Navbharat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.