तिस-या व अखेरच्या शाही स्नानाची पर्वणी भर पावसात संपन्न
By admin | Published: September 18, 2015 08:27 AM2015-09-18T08:27:59+5:302015-09-18T11:05:08+5:30
कुंभमेळ्याच्या तिस-या व अखेरच्या शाही स्नानाला शुक्रवारी पहाटे सुरुवात झाली आहे. पहिलं स्नान कुणी करायचं यावरून किंचित धुसफूस झाली असली
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १८ - जगभरातल्या हिंदूंच्या आकर्षणाचा विषय असलेल्या कुंभमेळ्याच्या तिस-या व अखेरच्या शाही स्नानाला शुक्रवारी पहाटे रामकुंडावर सुरुवात झाली आणि भर पावसामध्ये महत्त्वाच्या तिन्ही आखाड्यांच्या साधुंनी, त्यांच्या दैवतांसह, शस्त्रांसह व निशाणांसह रामकुंडावर हजेरी लावत शाही स्नान केले. पावसामुळे शाही स्नानासाठी निघालेल्या मिरवणुकींना थोडा विलंब झाला आणि त्यानंतर पहिलं स्नान कुणी करायचं यावरून किंचित धुसफूस झाली. परंतु पालक मंत्री गिरीश महाजन व जिल्हाधिकारी उपेंद्र कुशवाह यांनी परंपरेने चालत आलेल्या व सर्व आखाड्यांनी मंजूर केलेल्या कार्यक्रम पत्रिकेवर बोट ठेवले आणि आखाड्यांमधील वादाला लगाम घातला. त्यामुळे आता परिस्थिती नियंत्रणात व उत्साहात आली आहे. खालसा आखाड्याच्या साधुंनी आधी स्नान केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. आधी शस्त्रास्त्रांचं पूजन व्हायला हवं अशी भूमिका घेत दिगंबर आखाड्याच्या साधुंनी हरकत घेतली होती व बहिष्काराचा इशारा दिला होता. मात्र, पावसाने चांगलीच दमदार हजेरी लावल्याच्या पार्श्वभूमीवर उत्साहाने भारलेल्या वातावरणात तणाव निवळला आणि शाही स्नानाला सुरुवात झाली. नाशिक. धुळे, नंदूरबार अशा उत्तर महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असून वरूणराजाने योग्य वेळी कृपा केल्याची भावना व्यक्त होत आहे.
अखेर शाही स्नानाच्या समाप्तीनंतर सर्वसामान्यांसाठी घाट खुले करण्यात येत आहेत.