सलग तिस-या वर्षी महाराष्ट्र देशातील सर्वात भ्रष्ट राज्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 03:56 PM2017-12-01T15:56:26+5:302017-12-01T15:58:11+5:30
महाराष्ट्राने सलग तिस-या वर्षी सर्वात भ्रष्ट राज्य असण्याचा 'गौरव' प्राप्त केला आहे.
नवी दिल्ली: महाराष्ट्राने सलग तिस-या वर्षी सर्वात भ्रष्ट राज्य असण्याचा 'गौरव' प्राप्त केला आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचा अहवाल (एनसीआरबी) प्रसीद्ध झाला आहे. यानुसार 2016 मध्ये राज्यात भ्रष्टाचाराचे 1 हजार 16 प्रकरणं समोर आली. म्हणजे देशातील एकूण भ्रष्टाचाराच्या तब्बल 22.9 टक्के घटना या एकट्या महाराष्ट्रात समोर आल्या आहेत. 2015 मध्ये राज्यात भ्रष्टाचाराच्या 1279 तर 2014 मध्ये 1316 घटना समोर आल्या होत्या, त्या तुलनेत 2016 मध्ये आकडेवारी कमी झाल्याचं दिसतं.
महाराष्ट्राखालोखाल ओडिसाचा नंबर लागतो. ओडिसामध्ये भ्रष्टाचाराच्या 569 घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर केरळमध्ये 430 , मध्य प्रदेशमध्ये 402 , आणि राजस्थानमध्ये 387 प्रकरणं समोर आली आहेत.
- राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा-
महाराष्ट्रात गुन्ह्य़ांची संख्या 2015 मधील 4 लाख 23 हजारांवरून 2016 मध्ये 4 लाख 30 हजारांवर गेली. पण तरीसुद्धा महाराष्ट्रातील प्रमाण देशाच्या सरासरीपेक्षा कमी म्हणजे 217 इतके आहे.
- सर्वाधिक जास्त गुन्ह्य़ांची नोंद उत्तर प्रदेशात-
देशातील सर्वाधिक जास्त गुन्ह्य़ांची नोंद उत्तर प्रदेशातच झाली आहे. 2016 मधील एकूण गुन्ह्य़ांची संख्या 48 लाख 31 हजार 515 इतकी आहे. 2015 मध्ये हीच संख्या 47 लाख 10 हजार 676 इतकी होती. म्हणजे गुन्ह्य़ांमध्ये 2.6 टक्क्यांनी वाढ झाली. त्यापैकी उत्तर प्रदेशात 2 लाख 82 हजार गुन्ह्य़ांची नोंद आहे. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळचा नंबर आहे. महिलांवरील अत्याचारांच्या आणि दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली नोंदविलेल्या गुन्ह्य़ांच्या संख्येतही किंचित वाढ झाल्याचे अहवाल सांगतो.
- 'मर्डर'मध्ये योगींचं राज्य नंबर 1-
2016 मध्ये अपेक्षेप्रमाणे देशातील सर्वाधिक जास्त हत्यांची नोंद उत्तर प्रदेशात झाली असल्याचं समोर आलंय. गेल्या वर्षी खूनाच्या येथे सर्वाधिक 4,889 घटना घडल्या आहेत. त्या खालोखाल बिहारचा नंबर आहे, येथे 2 हजार 581 खून पडले.