निवडणूक नाट्याची आज तिसरी घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 04:54 AM2018-03-07T04:54:02+5:302018-03-07T04:54:02+5:30
गेले काही महिने नाट्यसृष्टीत रंगलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणूक नाट्याची तिसरी घंटा आज संध्याकाळी वाजणार आहे. सध्या गाजत असलेल्या नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा संपूर्ण अधिकृत निकाल आज (दि. ७ मार्च) जाहीर होणार आहे.
- राज चिंचणकर
मुंबई - गेले काही महिने नाट्यसृष्टीत रंगलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणूक नाट्याची तिसरी घंटा आज संध्याकाळी वाजणार आहे. सध्या गाजत असलेल्या नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा संपूर्ण अधिकृत निकाल आज (दि. ७ मार्च)
जाहीर होणार आहे. मुंबईसह राज्यातल्या इतर ठिकाणचे निकालही या वेळी घोषित करण्यात येतील. त्यामुळे बहुचर्चित निवडणुकीत
कोणाची सरशी होणार, यावरचाही पडदा उघडला जाणार आहे. मुंबई मध्यवर्ती, मुंबई उपनगर, नागपूर, अकोला, वाशीम, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, बेळगाव या ठिकाणी झालेल्या नाट्य परिषदेच्या निवडणुकीचे अधिकृत निकाल आज हाती येतील. मुंबई
मध्यवर्ती विभागात एकूण ११ जागा असून, मुंबई उपनगरात ५ जागा आहेत. या निवडणुकीत नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष मोहन जोशी
यांना निवडणूक लढविता आली नसली, तरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय ‘मोहन जोशी पॅनल’ आणि प्रसाद कांबळी व सहका-यांचे ‘आपलं पॅनल’ यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यांच्याबरोबरच मुंबई उपनगरात सक्रिय असलेले ‘नटराज पॅनल’ आणि काही अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीत रंगत आणली होती.
नाट्य परिषदेचे प्रमुख निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी हे निवडणुकीचा अधिकृत निकाल नाट्य परिषदेच्या मुंबई मध्यवर्ती
कार्यालयात घोषित करणार आहेत. मुंबईसह इतर जिल्ह्यांतील निवडणुकीचे निकाल काय लागतात, यावर नाट्य परिषदेवर कुणाचा अंकुश राहणार हे नक्की होणार आहे. निकालानंतर काही दिवसांतच नवनिर्वाचित सदस्यांची बैठक होऊन पुढची
पावले उचलली जातील. त्यानंतरच नाट्य परिषदेच्या भावी अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते ते ठरणार आहे.