स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 06:21 AM2024-11-22T06:21:59+5:302024-11-22T06:23:06+5:30
मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मतदानयंत्रांची रवानगी स्ट्राँग रूममध्ये करण्यात आली असून त्यांच्यावर सीसीटीव्हीने लक्ष ठेवण्यात येत आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा खाली बसल्यानंतर मुंबई-महामुंबईतील मतदारांनी बुधवारी
मतदानाचा हक्क बजावला. मुंबईत ५३ टक्के तर पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे ६०, ५६ आणि ७० टक्के मतदान झाले.
मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मतदानयंत्रांची रवानगी स्ट्राँग रूममध्ये करण्यात आली असून त्यांच्यावर सीसीटीव्हीने लक्ष ठेवण्यात येत आहे. आता उद्या, शनिवारी ही मतदानयंत्रे मतमोजणी केंद्रांमध्ये पोहोचल्यानंतर सर्व राजकीय पक्षाच्या उमेदवारांचे भवितव्य स्पष्ट होईल.
मुंबईच्या शहर आणि उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मतदान संपल्यानंतर रात्रीच सर्व मतदान केंद्रावरील ईव्हीएम स्ट्राँगरूम नेण्यात आल्या आहेत. अनेक स्ट्राँगरूम या मतमोजणी केंद्रांवर
आहेत तर काही स्ट्राँगरूम या मतमोजणी केंद्रापासून दहा मिनिटांच्या अंतरावर आहेत.
शनिवारी सकाळी ७ वाजता मशीन्स मतमोजणी केंद्रावर दाखल केल्या जाणार असतानाच गुरुवारी सगळ्याच स्ट्राँगरूमसह मतमोजणी केंद्रावर सुरक्षा यंत्रणेचा फौजफाटा तैनात करण्यास सुरुवात झाली होती. त्यानुसार, चांदिवली विधानसभेचे मतमोजणी केंद्र विद्याविहार पश्चिमेकडील आयटीआय येथे असून, या केंद्रावर बुधवारपासूनच पोलिस आणि दंगल नियंत्रण पथक दाखल झाले होते.
केंद्राच्या गेटवर दंगल नियंत्रण पथकाचे जवान तैनात करण्यात आले होते. एकूण ३६ स्ट्राँग रुमच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव सुरक्षा दल (सीआरपीएफ), केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) यांच्यासह राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) तसेच पोलिस तैनात आहेत.
ठाण्यात ८७५५ ईव्हीएमची सुरक्षा
ठाणे जिल्ह्यातील ६,९५५ मतदान केंद्रांमधील ८,७५५ मतदान यंत्रांसह कंट्राेल युनिट आणि व्हीव्हीपॅटची सुरक्षाव्यवस्था केंद्रीय सुरक्षा दलासह स्थानिक पाेलिसांवर आहे. मतदान यंत्रे ठेवलेल्या स्ट्राँगरूमवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आणि सुरक्षा जवानांचा कडक बंदाेबस्त ठेवला आहे. उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष मतमोजणी होणार आहे.
त्रिस्तरीय सुरक्षेत ईव्हीएम
नवी मुंबईत ऐरोलीतील ईव्हीएम तेथील सरस्वती विद्यालयात तर बेलापूरच्या मशिन्स नेरूळच्या आगरी कोळी भवनमध्ये ठेवल्या आहेत. दोन्ही ठिकाणी ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय बंदोबस्त लावण्याला असून प्रत्येक हालचालीवर सीसीटीव्हींची देखील नजर ठेवली आहे. मशिन्स ठेवलेल्या ठिकाणी सीआरपीएफ, गुजरात एसआरपी व नवी मुंबई पोलिस यांच्या तुकड्यांचा समावेश आहे. तर केंद्राच्या बाहेरदेखील कोणतीही गैर हालचाल घडू नये यासाठी दहा अधिकारी व ३० कर्मचाऱ्यांचा दिवस-रात्र बंदोबस्त ठेवला आहे.
पालघर, रायगडात स्ट्राँग रूमवर खडा पहारा
पालघर जिल्ह्यात सहा ठिकाणी स्ट्राँग रूम असून मतदान यंत्रे कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत ठेवण्यात आली आहेत. तसेच रायगड जिल्ह्यातील सात मतदारसंघातील मतदान यंत्रे तेथील स्ट्राँग रूममध्ये पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत. पनवेलमधील मतमोजणी केंद्रावर ६८९ कर्मचारी कार्यरत राहतील.