‘डेथ आॅन विंग्स’ला मिळाला तिसरा आंतरराष्ट्रीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 06:38 AM2018-11-28T06:38:18+5:302018-11-28T06:38:35+5:30
वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आॅफ द इयर : वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांनी टिपला दुर्मीळ क्षण
औरंगाबाद : येथील जागतिक किर्तीचे वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांनी राजस्थानमधील ताल छापर राष्ट्रीय उद्यानात काढलेल्या ‘डेथ आॅन विंग्स’ या छायाचित्राला ‘सेन्च्युरी एशिया’च्या ‘वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आॅफ द इयर’ या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने मुंबईत गौरविण्यात आले. याआधी याच छायाचित्राला दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
हरणाच्या पाडसाची शिकार करणाऱ्या गरुडाचे हे छायाचित्र भारतातून ३८ हजार, आशियातून ८ हजार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरुन आलेल्या १२ हजार छायाचित्रांतून अव्वल ठरले. राजस्थानातील ताल छापर उद्यानात हरणाच्या दोन दिवसांच्या पाडसाची गरुड शिकार करत असतानाचा क्षण कॅमेºयात टिपण्यासाठी बैजू यांना तब्बल तीन वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. हे छायाचित्र मार्च २०१७ मध्ये काढण्यात आले.
बैजू पाटील म्हणाले की, हरणाच्या पाठीमागे त्याचे पाडस धावत होते. आकाशातून गरुडाचे त्याच्याकडे लक्ष होते. हरणाचा वेग जास्त असल्याने दोघांमध्ये बरेच अंतर होते. गरुडाने पाडसावर झडप घातली व पंजात धरून उचलण्याचा प्रयत्न केला. पण हरणाने गरुडाचा प्रतिकार करत त्याला वाचवले. पाडसाला किरकोळ जखम झाली.
कन्झर्वेशन नेचर फाऊंडेशनकडून गौरव
या छायाचित्राला ‘सेन्च्युरी एशिया’ मासिकाकडून नुकतेच मुंबईतील रॉयल ओपेरा हाऊसमध्ये कन्झर्वेशन नेचर फाऊंडेशनचे उर्वी परिमल यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
मासिकाचे संपादक बिट्टू सहेगल उपस्थित होते. या छायाचित्राला येस बँकेकडून फोटोग्राफर आॅफ द इअर आणि डी. जे. मेमोरियलकडून आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाला आहे.