पुण्यात होऊ शकते तिसरी महानगरपालिका
By admin | Published: April 2, 2015 04:53 AM2015-04-02T04:53:23+5:302015-04-02T04:53:23+5:30
पुणे महानगरपालिका हद्दीलगतच्या ३४ गावांचा समावेश पुणे महापालिकेत करायचा की, स्वतंत्र महापालिका बनवायची याबाबत अद्याप निर्णय झाला नाही.
मुंबई : पुणे महानगरपालिका हद्दीलगतच्या ३४ गावांचा समावेश पुणे महापालिकेत करायचा की, स्वतंत्र महापालिका बनवायची याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. मात्र या सर्व गावांचे क्षेत्रफळ पुणे महानगरपालिकेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या ३४ गावांची स्वतंत्र महापालिका स्थापन करता येऊ शकते, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
पुणे पालिका हद्दीत ३४ गावांचा समावेश करण्याचा मुद्दा प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान कॉंग्रेसचे अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, समािवष्ट करण्यात येणाऱ्या ३४ गावांंच्या यादीत यापूर्वी वगळण्यात आलेल्या २७ पैकी १५ गावांचा समावेश आहे. तसेच या ३४ गावांच्या समावेशाचा प्रस्ताव सध्या ग्रामविकास विभागाकडे आहे. सुनावणीसाठी तो खुला करण्यात आला आहे. नगरविकास विभागाने अद्याप या गावांच्या समाविष्टतेबाबत कोणताही निर्णय केलेला नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील अनेक महापालिकांचा रिजनल प्लॅन तयार करण्यात आलेला नाही. या पाश्वर्भूमीवर सर्व महापालिकांचे रिजनल प्लॅन तयार करण्याचे आदेश त्वरीत देण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. (प्रतिनिधी)