खासदार शेट्टींच्या नेतृत्वाखाली तिसरा पर्याय?
By admin | Published: July 9, 2014 01:44 AM2014-07-09T01:44:48+5:302014-07-09T01:44:48+5:30
शिवसेना-भाजपासह दोन्ही काँग्रेसमधील नाराजांना एकत्र करून विधानसभा निवडणुकीत तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
Next
विश्वास पाटील - कोल्हापूर
शिवसेना-भाजपासह दोन्ही काँग्रेसमधील नाराजांना एकत्र करून विधानसभा निवडणुकीत तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार राजू शेट्टी व माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रयत्न आहेत. साखरपट्टय़ातील मातब्बर नेत्यांची एकजूट करून किमान 45 जागा लढविता येतील का, यासंबंधीची चाचपणी सुरू झाली आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर महायुतीला एकत्र बांधून ठेवणारा नेता नसल्याने शिवसेना-भाजपामध्ये एकमेकांचे पाय ओढण्याचे राजकारण जोरात सुरू झाले आहे. लोकसभा निवडणुकीत युतीला विधानसभेच्या 245 मतदारसंघांत मताधिक्य मिळाल्याने नेते हवेत आहेत. दोन्ही काँग्रेसमध्ये स्वबळावर लढण्याची भाषा केली जात आहे.
शिवसेना-भाजपानेही तसाच शड्ड ठोकला तरी युतीशिवाय दोन्ही पक्षांकडे पर्याय नाही. परंतु मुंडे यांच्या निधनामुळे समन्वयाचा धागा तुटल्याचे महायुतीतीलच नेत्यांनाही जाणवू लागले आहे. सांगलीतून भाजपाचे नाराज आमदार संभाजी पवार यांच्या मुलाऐवजी
नीता केळकर यांना उमेदवारी देण्याचा आग्रह खासदार संजय पाटील यांच्याकडून धरला
जात आहे. प्रकाश शेंडगे व सुरेश खाडे
यांच्या उमेदवारीवरूनही अशीच रस्सीखेच
सुरू आहे.
महायुतीतील या कुरघोडीच्या राजकारणामुळे खासदार शेट्टीही नाराज आहेत. त्यामुळे स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून तिसरा पर्याय उपलब्ध झाल्यास प्रमुख पक्षांतील नाराजांची लढण्याची तयारी आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून महाराष्ट्राच्या राजकारणातील चार प्रमुख पक्षांतील नाराज नेत्यांना एकत्र करून काही वेगळेच व्यासपीठ स्थापन करता येईल का, अशा हालचाली सुरू आहेत.