देशभरातील जुन्या रेल्वे पुलांचे '' थर्ड पार्टी ऑडिट "

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 07:53 PM2019-03-26T19:53:34+5:302019-03-26T20:03:10+5:30

काही दिवसांपुर्वी मुंबईत पादचारी पुल कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. तर सप्टेंबर २०१७ मध्ये एलफिन्सट्न पुलावर मोठी चेंगराचेंगरी होऊन २३ जणांना आपला जीव गमवावा लागला.

Third party audit of old railway bridges in the country | देशभरातील जुन्या रेल्वे पुलांचे '' थर्ड पार्टी ऑडिट "

देशभरातील जुन्या रेल्वे पुलांचे '' थर्ड पार्टी ऑडिट "

Next
ठळक मुद्देसंगम, हॅरीस पुल : पहिल्यांदाच त्रयस्थ यंत्रणेकडून स्टॅक्चरल ऑडीट करण्याचा निर्णयपहिल्यांदाच थर्ड पार्टी ऑडिट होणार असल्याने या पुलांची सद्यस्थिती समोर येणार पुणे विभागामध्ये रेल्वेचे १ हजारांहून अधिक पुल

- राजानंद मोरे- 
पुणे : देशभरातील जुन्या रेल्वे पुलांचे त्रयस्थ (थर्ड पार्टी) यंत्रणेमार्फत स्ट्रॅक्चरल ऑडीट करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. आतापर्यंत या पुलांचे रेल्वेच्या अंतर्गत यंत्रणेकडूनच ऑडिट केले जात होते. पहिल्यांदाच थर्ड पार्टी ऑडिट होणार असल्याने या पुलांची सद्यस्थिती समोर येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्यात पुणे विभागातील ब्रिटीशकालीन संगम पुल, हॅरीस पुल व नीरा नदीवरील पुलाचा समावेश आहे.
काही दिवसांपुर्वी मुंबईत पादचारी पुल कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. तर सप्टेंबर २०१७ मध्ये एलफिन्सट्न पुलावर मोठी चेंगराचेंगरी होऊन २३ जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने सर्व रेल्वे पुलांची तपासणी करण्याची मोहिम हाती घेतली. मध्य रेल्वेने मुंबईतील सर्व रेल्वे पुलांचे ऑडिट इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मार्फत केले आहे. पुणे विभागामध्ये रेल्वेचे १ हजारांहून अधिक पुल आहेत. त्यामुळे जुन्या पुलांची संख्या तुलनेने मर्यादित आहे. त्यातही ब्रिटिशांनी बांधलेले पुल बोटावर मोजण्याइतपत आहेत. पुण्यामध्ये मुळा नदीवर हॅरीस पुल, मुठा नदीवर संगम पुल हे सर्वात जुने ब्रिटीशकालीन पुल आहेत. तसेच विभागात काही ठिकाणी असे पुल अजूनही सुस्थितीत आहेत. 
रेल्वे प्रशासनाकडून पादचारी पुलांसह रेल्वेची वाहतुक होत असलेल्या पुलांचे ठराविक कालावधीने ऑडिट केले जाते. तसेच वर्षातून किमान एक-दोन वेळा पुलांची तपासणी केली जाते. त्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास त्या तातडीने दुरूस्त केल्या जातात. हे काम रेल्वेतील अंतर्गत यंत्रणेमार्फतच केले जाते. पण आता प्रशासनाने त्रयस्थ संस्थेकडून जुन्या पुलांचे स्ट्रॅक्चरल ऑडिट केले जाणार आहे. पहिल्यांच थर्ड पार्टी ऑडिट होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पहिल्या टप्प्यामध्ये संगम व हॅरीस पुलासह नीरा नदीवरील पुलाचा समावेश आहे. या ऑडिटसाठी संस्था निवडण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच ऑडिटचे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. 
---------------
संगम पुल : मुठा नदीवर सध्या रेल्वे व इतर वाहनांसाठी स्वतंत्र पुल आहेत. वाहनांसाठी असलेला पुल १८५७ मध्ये उभारण्यात आला आहे. या पुलावरून १९२९ पर्यंत रेल्वे वाहतुक सुरू होती. त्यानंतर या पुलाच्या जवळच नवीन पुल बांधून त्यावरून रेल्वे वाहतुक सुरू करण्यात आली. त्यामुळे रेल्वेचा हा पुलही संगम पुल म्हणून ओळखला जातो. हा पुल जवळपास २१५ मीटर लांबीचा असून केवळ दहा थांबांवर उभा राहिलेला आहे. हे खांब दगडी असून वरच्या भागात मात्र लोखंडी गर्डर टाकण्यात आले आहेत. मधल्या भागातील दोन चार खांबांमध्ये प्रत्येकी १९.३५ मीटर अंतर आहे. तर उर्वरीत नऊ पाकळ्यांमधील अंतर १९.२ मीटर एवढे आहे. या पुलाचा पाया लोखंडी खांबांचा आहे. साधारणपणे १५ वर्षांपुर्वी पाया व खांबांवर सिमेंट काँक्रीटचा थर लावण्यात आला आहे. 
----------
मुळा नदीवरील हॅरीस पुल (मुळा पुल) : या पुलाचे बांधकाम १८५८ मध्ये पुर्ण झाले. संपुर्ण पुलाची बांधणी दगडी असून आकर्षक रचना आहे. जवळपास १७५ मीटर लांबी असलेला हा पुल मुळा नदीवर असून जवळपास २१ दगडी खांबांवर उभा आहे. पुलाचे मधल्या भागात ९.१५ मीटर अंतरावर दोन खांब आहेत. त्यानंतर दोन्ही बाजूला ७.९२ मीटर लांबीच्या अंतराने खांबांची उभारणी करण्यात आली आहे. जवळपास १६० वर्ष जुना असलेला हा पुल रेल्वे वाहतुकीसाठी अद्याप दणकट आहे. रेल्वेच्या दप्तरी या पुलाची नोंद मुळा पुल अशी आहे.
------------------------
नीरा पुल : पुणे व सातारा जिल्ह्याला जोडणारा हा पुल नीरा नदीवर आहे. हा पुल जवळपास १२५ वर्षांपुवीर्चा आहे. संपुर्ण दगडी बांधकाम असलेल्या या पुलाची बांधणी १८९५ मध्ये पुर्ण झाली. हा पुल एकुण १३ खांबांवर उभा राहिला असून सुमारे १९५ मीटर लांब आहे. पुलाच्या एकुण १३ खांबांमधील अंतर प्रत्येकी १५.५ मीटर एवढे आहे. तर एका पाकळीतील अंतर ६.१ मीटर आणि दुसºया पाकळीतील अंतर १.५१ मीटर एवढे आहे. अशा एकुण १४ पाकळ्या  आहेत. हा पुलही रेल्वे वाहतुकीसाठी अजूनही योग्य मानला जातो.ब्रिटीशकालीन पुलांची क्षमता जवळपास १६ टन वजन पेलण्याइतपत आहे. पण सध्या २२ टनांहून अधिक वजनाच्या रेल्वेगाड्या या पुलांवरून धावत आहेत. तसेच पुर्वी गाड्यांचा वेगही कमी होता. त्यातुलनेत सध्याच्या गाड्यांचा वेग दुपटीने वाढला आहे. असे असतानाही तीनही पुल सुरक्षित आहेत. पण तरीही या पुलांचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Third party audit of old railway bridges in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.