उदयनराजेंच्या विरोधात तृतीयपंथीय उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 04:38 AM2019-03-14T04:38:08+5:302019-03-14T04:39:12+5:30
किन्नरांच्या दुर्लक्षित प्रश्नांसाठी प्रशांत वारकर उतरणार मैदानात
सातारा : सातारा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात महायुती, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे राहणार आहेत. त्याबरोबरच आता तृतीयपंथीयांचा उमेदवार म्हणून प्रशांत वारकर निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.
कायद्याने तृतीयपंथीयांना स्वतंत्र नागरिकत्व बहाल केल्यानंतर आता विकासाची धोरणं बनविण्याच्या प्रक्रियेतही आमचा सहभाग असावा, असे सांगून वारकर म्हणाले, ‘प्रस्थापित समाजानं आमचं अस्तित्व कायम नाकारलं. हाडामासाची माणसं असूनही केवळ आमच्या नैसर्गिक भावनांचा कौल ऐकून जगणंही समाजाला नको होतं. यातून गेल्या काही दशकांतील आमची लढाई यशस्वी झाली आणि आम्हाला कायद्यानेच स्वतंत्र अस्तित्व बहाल केले. कायद्याने दिलेले हे अस्तित्वही नाकारण्याचे अनुभव आम्हाला आले. त्यामुळे आमच्या हक्कांसाठी निवडणूक रिंगणात उतरण्याचं मी ठरविलं आहे.’