तृतीयपंथीयांची मागणी :काम द्या; टाळी वाजविणार नाही!
By admin | Published: August 12, 2016 01:06 AM2016-08-12T01:06:16+5:302016-08-12T01:06:16+5:30
घरच्यांनी हाकलून दिलं. समाजाने स्वीकारलं नाही. काम करायची इच्छा आहे. आम्ही सफाई कामगाराचं कामही करू. पण ते देखील मिळत नाही
पुणे : घरच्यांनी हाकलून दिलं. समाजाने स्वीकारलं नाही. काम करायची इच्छा आहे. आम्ही सफाई कामगाराचं कामही करू. पण ते देखील मिळत नाही. म्हणून नाईलाजाने भीक मागावी लागते. आम्हाला काम द्या, टाळी वाजविणार नाही, अशी भावना तृतीयपंथीयांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृतीयपंथीयांना न्याय्य हक्क द्या, त्यांनाही माणूस म्हणून वागवा. शासकीय पातळीवरूनच त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला, असे आवाहन केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघातील तृतीयपंथीयांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील तृतीयपंथीयांशी संवाद साधला असता निसर्गाने घोर अन्याय केलाच, पण त्यापेक्षा समाज त्यांना दररोज मरणयातनाच देतो, असे दिसून आले.
येरवडा परिसरातील आप्पा पुजारी यांनी तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी भांडायला सुरुवात केली आहे. पण याची दखल कोणी घेत नाही. आम्हालाही इतरांप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. पण अज्ञानाच्या गर्तेत आमचे लोक आहे. शासकीय पातळीवरही आमच्याबाबत अनास्थाच दिसते, असे आप्पा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितले.
आप्पा म्हणाला, ‘‘ मला लहानपणापासून मुलींसारखे बोलायला आवडायचे. त्यांच्यात बसायला आवडायचे. मुलांच्या चिडविण्याला कंटाळून शाळाही सोडावी लागली. माझ्यामुळे सगळ्या नातेवाइकांनी घरच्यांशी संपर्क तोडला. वयाच्या दहाव्या वर्षी मी घर सोडून मुंबईला गेले. १५ वर्षांनंतर मी जेव्हा पुण्यात आले आणि माझ्या घरी राहायला लागले. पुण्यात आल्यावर काम मागायला गेले असता हाकलून लावण्यात आले. त्यामुळे पैसे मागायला सुरुवात केली. समाजाने आम्हाला स्वीकारावे.’’
मोनिकाची कहाणी तर खूप वेगळी. मूळची हैदराबादची असलेली मोनिका दहावीपर्यंत शिकली आहे. मोनिका म्हणाली, ‘‘शिक्षणाची आवड होती, पण शाळेतील सवंगड्यांकडून क्रूरतेचा अनुभव आला. त्यामुळे शिक्षण पूर्ण करता आले नाही. मुलीसारखे राहात असल्याने घरच्यांनी हाकलून दिले. वयाच्या १५व्या वर्षी घर सोडून मी पुण्याला आले. काम शोधायला सुरुवात केली. पण लोकांनी हाकलून दिले. त्यामुळे टाळी वाजवून उदरनिर्वाह करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.’’