तृतीयपंथींच्या योजना ‘महिला-बालकल्याण’कडे
By admin | Published: April 29, 2017 03:08 AM2017-04-29T03:08:54+5:302017-04-29T03:08:54+5:30
महिला-बालविकास विभागामार्फत कार्यकारी समिती नेमून त्यामार्फत तृतीयपंथींसाठी प्रस्तावित असलेल्या केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील
मुंबई : महिला-बालविकास विभागामार्फत कार्यकारी समिती नेमून त्यामार्फत तृतीयपंथींसाठी प्रस्तावित असलेल्या केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील, असे महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे सांगितले.
तृतीयपंथींच्या कल्याणासाठी केंद्र सरकारतर्फे पाच योजना राबविण्यात येणार आहेत. त्यांची अंमलबजावणी महिला व बालकल्याण विभागामार्फतच करण्यात येईल, असे आजच्या बैठकीत ठरले. तृतीयपंथींच्या विविध संघटनांसमवेत मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस महिला आणि बालविकास विभागाच्या सचिव विनिता सिंघल, तृतीयपंथींच्या शिष्टमंडळाच्या प्रमुख लक्ष्मी नारायण त्रिपाठी, अस्तित्व संघटनेचे प्रतिनिधी अथर्व यश, तन्मय, सखी चारचौघी संघटनेच्या प्रतिनिधी गौरी सावंत, किन्नर अस्मिता संघटनेच्या प्रतिनिधी मुजरा बक्ष, किन्नर माँ संघटनेच्या प्रतिनिधी प्रिया पाटील, एकता फाउंडेशनच्या प्रतिनिधी अभिरामी, त्रिवेणी संगम संघटनेच्या प्रतिनिधी वासवी, समर्पण ट्रस्टच्या प्रतिनिधी किरण, नाशिक प्रबोधिनीच्या प्रतिनिधी उमा आदी उपस्थित होते.
तृतीयपंथी शिष्टमंडळाच्या प्रमुख लक्ष्मी नारायण त्रिपाठी म्हणाल्या, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वीच तृतीयपंथींसाठी कल्याणकारी मंडळ महाराष्ट्रात स्थापन झाले. देशातील अनेक राज्यांनी त्याचे अनुकरण करत अशी मंडळे त्या त्या राज्यात स्थापन केली आहेत. (विशेष प्रतिनिधी)