राज्यात तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत दुरंगी, तिरंगी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 06:17 AM2019-04-09T06:17:56+5:302019-04-09T06:18:13+5:30
मुंबई : राज्यातील १४ मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यासाठी २३ एप्रिलला होणाºया निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. अर्जमाघारीनंतर ...
मुंबई : राज्यातील १४ मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यासाठी २३ एप्रिलला होणाºया निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. अर्जमाघारीनंतर काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढतीचे चित्र आहे. बहुसंख्य ठिकाणी युती व आघाडीत थेट सामना होत आहे.
बारामतीत सुळे - कुल यांच्यातच लढत
बारामतीत २५ पैकी ७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस) व कांचन कुल (भारतीय जनता पार्टी) यांच्यात येथे प्रमुख लढत होईल. पुण्यातून ४३ उमेदवारांपैकी १२ अपक्षांनी अर्ज मागे घेतले. गिरीश बापट (भारतीय जनता पार्टी), मोहन जोशी (काँग्रेस) यांच्यात मुख्य लढत होणार आहे.
औरंगाबादेत चौरंगी, तर जालन्यात दुरंगी लढत !
सात उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर औरंगाबादमध्ये २३ उमेदवार मैदानात आहेत. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे, काँग्रेस-राष्टÑवादी महाआघाडीचे उमेदवार आ. सुभाष झांबड, एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आ. इम्तियाज जलील आणि शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार आ. हर्षवर्धन जाधव अशी चौरंगी लढत येथे होणार आहे. आ. अब्दुल सत्तार यांनी अपेक्षेप्रमाणे माघार घेतली. जालना लोकसभा मतदारसंघात २० उमेदवार रिंगणात असले तरी येथे भाजपचे रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे विलास औताडे यांच्यात थेट लढत होईल.
कोल्हापूर, हातकणंगलेत दुरंगी लढत
कोल्हापूरमध्ये १५ तर हातकणंगलेत १७ जण रिंगणात आहेत. कोल्हापुरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खा. धनंजय महाडिक विरुद्ध शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक यांच्यात, तर हातकणंगलेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी विरुद्ध शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. दोन्ही मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रिंगणात आहेत.
सांगलीत बहुरंगी लढत
सांगलीत १२ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे संजय पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील आणि बहुजन वंचित आघाडीचे गोपीचंद पडळकर हे प्रमुख उमेदवार आहेत. साताºयात ९ जण रिंगणात आहेत. कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे व शिवसेनेचे कार्यकर्ते किशोर धुमाळ यांनी अपक्ष अर्ज मागे घेतले. उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी), नरेंद्र पाटील (शिवसेना) यांच्यात प्रमुख लढत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढामध्ये ३१ उमेदवार आहेत. भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर, राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्यात प्रमुख लढत होईल.
रायगडमध्ये सेना-राष्ट्रवादीत लढत
रायगडमध्ये १६ उमेदवार रिंगणात आहेत. अनंत गंगाराम गीते (शिवसेना), सुनील दत्तात्रेय तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांच्यात प्रमुख लढत आहे. रत्नागिरी - सिंधुदुर्गमध्ये १२ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेचे विनायक राऊत, स्वाभिमानचे नीलेश राणे, काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकर हे प्रमुख उमेदवार आहेत.
जळगावला थेट सामना
जळगाव व रावेर मतदार संघात एकूण २६ उमेदवार रिंगणात आहेत. जळगावमध्ये उन्मेश भैय्यासाहेब पाटील (भाजप), गुलाबराव बाबुराव देवकर (राष्टÑवादी काँग्रेस), अंजली रत्नाकर बाविस्कर (वंचित बहुजन आघाडी) हे तीन प्रमुख उमेदवार आहेत. रावेरमध्ये डॉ. उल्हास
वासुदेव पाटील (काँग्रेस) व रक्षा निखिल खडसे (भाजप) व नितीन प्रल्हाद कांडेलकर (वंचित बहुजन आघाडी) हे तीन प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत.
शेट्टी विरुद्ध शेट्टी आणि शिट्टी
हातकणंगले मतदारसंघातून बहुजन मुक्ती पार्टीतर्फे राजू मुजीकराव शेट्टी यांना शिट्टी हे चिन्ह मिळाले आहे. ते मूळचे मुंबईचे राहणारे आहेत. गेल्या निवडणुकीत खा. शेट्टी यांचे चिन्ह शिट्टी होते. या निवडणुकीत शेट्टी आडनाव व शिट्टी चिन्ह असा दुहेरी संभ्रम व्हावा यासाठी विरोधी उमेदवारानेच त्यांना रिंगणात उतरवले असल्याची तक्रार स्वाभिमानी पक्षाने निवडणूक अधिकाऱ्यांकडे सोमवारी केली.
अहमदनगरमध्ये विखे-जगताप सामना
७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. १९ जण रिंगणात आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे (भाजप) व आमदार संग्राम अरूणकाका जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्यात थेट लढत होईल.