विरोधकांचा संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा सुरू
By Admin | Published: April 25, 2017 04:40 PM2017-04-25T16:40:23+5:302017-04-25T16:40:23+5:30
राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळावर त्यांना वंदन करून विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आज प्रारंभ झाला.
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 25 - शेतकरी कर्जमाफीसाठी कोल्हापूरच्या आई महालक्ष्मीला साकडे घालून आणि राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळावर त्यांना वंदन करून विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आज प्रारंभ झाला. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर घणाघाती हल्ला चढवला.
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत या नादान, मुर्दाड सरकारच्या विरोधात लढण्याचे व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे सामर्थ्य आम्हाला दे, असे साकडे आज आई अंबाबाईला घातल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, वरिष्ठ काँग्रेस नेते रोहिदास पाटील, संघर्ष यात्रेचे समन्वयक आ. सुनील केदार यांच्यासह प्रमुख स्थानिक नेते व अनेक आमदार उपस्थित होते.
तूर उत्पादकांना लुटण्यासाठी व्यापाऱ्यांना सरकारचा खुला परवाना!
राज्यभरात तूर खरेदीबाबत सुरू असलेल्या अनागोंदी कारभारावर आसूड ओढताना विखे पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांकडील शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी करण्याचा शब्द सरकारने दिला होता. परंतु शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल तूर पडून असताना खरेदी बंद करणे हा शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे. सरकारने शासकीय खरेदी बंद करून व्यापाऱ्यांकडे कवडीमोल भावाने तूर विक्री करण्यास शेतकऱ्यांना बाध्य केले आहे. तूर खरेदी बंद करणे म्हणजे व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांच्या लुटीसाठी खुला परवाना देण्यासारखेच असल्याची तोफ विरोधी पक्षनेत्यांनी डागली.
खा. राजू शेट्टींनी आरोप करण्याचा धंदा बंद करावा!
राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी खा. राजू शेट्टी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचाही चांगलाच समाचार घेतला. नाफेडचे अधिकारी आणि व्यापाऱ्यांमध्ये संगनमत असल्याच्या खा. राजू शेट्टींच्या आरोपावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, खा. राजू शेट्टींनी आरोप करण्याचा धंदा बंद करावा. ते आता सरकारमध्ये सहभागी आहेत. त्यामुळे अधिकारी व व्यापाऱ्यांचे संगनमत असल्याची माहिती त्यांच्याकडे असेल तर त्यांनी तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करावी. उद्धव ठाकरेंप्रमाणेच खा. राजू शेट्टीसुद्धा सत्तेचे सर्व लाभ उपभोगून सरकारवर टीका करण्याचा ढोंगीपणा करीत आहेत. उद्धव ठाकरे म्हणजे बडे मियाँ आणि खा. राजू शेट्टी म्हणजे छोटे मियाँ असल्याची खरमरीत टीका त्यांनी केली.
सदाभाऊ खोतांना इव्हेंट मॅनेजमेंटची लागण!
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांना सरकारमध्ये जाऊन भाजपासारखीच इव्हेंट मॅनेजमेंटची लागण झाल्याचा टोला विखे पाटील यांनी लगावला. सदाभाऊ खोत यांनी मध्यंतरी आठवडी बाजारात जाऊन भाजी विकण्याची नौटंकी केली. पण आता शेतकरी उद्ध्वस्त होत असताना ते मौन बाळगून आहेत. जनता जेवढ्या वेगाने डोक्यावर घेते, त्याच्या दुप्पट वेगाने जमिनीवर आपटते, हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ध्यानात ठेवावे, अशी इशारेवजा सूचनाही विरोधी पक्षनेत्यांनी दिली.
त्या भाजप खासदाराला नोबेल पुरस्कार द्या!
कर्जमाफीमुळे शेतकरी आळशी होतो, असे विधान करणारे गडचिरोलीचे भाजपा खासदार अशोक नेते यांचा विखे पाटील यांनी यावेळी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. भाजपच्या खासदाराने केलेल्या या विधानातून शेतकऱ्यांप्रति त्यांच्या सरकारची भूमिका स्पष्ट होते. कर्जमाफीमुळे शेतकरी आळशी होतो, हा नवीन जावईशोध लावल्याबद्दल खा. अशोक नेते यांना संशोधनातील नोबेल पुरस्कार दिला जावा, अशी खोचक मागणी त्यांनी केली.
महाराष्ट्र दिनी राज्यभरात कर्जमाफीसाठी ग्रामसभेचे ठराव करा...
शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याचा आणखी एक सनदशीर प्रयत्न म्हणून, येत्या महाराष्ट्र दिनी, 1 मे रोजी महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींनी शेतकरी कर्जमाफी व हमीभावाच्या मागणीसाठी ग्रामसभेत ठराव करून ते सरकारकडे पाठवावेत, असे आवाहन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केले. ते म्हणाले की, संघर्ष यात्रेमुळे सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झालेला आहे. या परिस्थितीत राज्यभरात ग्रामसभेचे ठराव झाले तर सरकारवर अधिक दडपण येईल.