फुटबॉल सामन्यात त्रयस्थ पंच नेमा
By admin | Published: December 22, 2015 12:21 AM2015-12-22T00:21:20+5:302015-12-22T00:56:19+5:30
प्रदीप देशपांडे : सीसीटीव्हीसह विविध अटी लावूनच हंगामाला परवानगी,नो बंदोबस्त
कोल्हापूर : कोल्हापूरच्या फुटबॉलला मोठी परंपरा आहे. गेल्यावर्षी जी घटना घडली, त्यात मैदानाबाहेरील निरपराध लोकांना त्रास झाला. त्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे आम्ही प्रथम या प्रश्नाला प्राधान्य देऊन एकूणच यंदाच्या हंगामात नियंत्रकाची भूमिका पार पाडू. या सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणून अटी व शर्ती लागू करूनच यंदाच्या हंगामास परवानगी देऊ, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचे पदाधिकारी, संघाच्या प्रतिनिधींच्याबरोबर पोलीस मुख्यालय येथे सोमवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
देशपांडे म्हणाले, मागील वर्षी एका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जो प्रकार घडला, त्यात हा वाद जर मैदानातच घडला असता तर त्याचे गांभीर्य नव्हते. मात्र, हा वाद मैदानाबाहेर आला आणि त्याचा फटका निरपराध लोकांना झाला. त्यामुळे यंदाच्या हंगामात फुटबॉल संघाचे समर्थक, खेळाडूंनी हा प्रश्न निर्माणच होणार नाही, याकरिता आपल्या समर्थकांत जागृती करावी. आम्ही या शतकाकडे निघालेल्या वैभवी फुटबॉल परंपरेला अडथळा निर्माण करणार नाही. आम्हीही कोल्हापूरचाच एक भाग म्हणून या फुटबॉलकडे पाहतो. त्यामुळे यंदाचा हा फुटबॉल हंगाम इतका चांगला करू की, राज्यात या कोल्हापूरचे नाव होईल. याकरीता मागच्या वर्षीचा अपघात होता म्हणूया. त्यापुढे अशा अटीतटीच्या सामन्यांकरीता विशेषत: स्थानिक पंच न नियुक्त करता तेथे पुणे किंवा अन्य ठिकाणचे पंच नियुक्त करावेत. त्यासह मैदानात संपूर्ण मैदानाचे चित्रीकरण होईल, असा ‘वाईड सीसीटीव्ही’ बसवावा. प्रत्येक सामन्याकरिता ‘सामना समन्वयक’ नेमणूक करावी, अशा सर्व अटी, शर्ती लागू करूनच या हंगामास मी परवानगी देत आहे.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व के.एस.ए.पेट्रन मालोजीराजे म्हणाले, कोल्हापूरचा फुटबॉलला मोठी परंपरा आहे. स्पर्धा भरविणारे प्रसंगी आपल्या खिशातून खर्च करतात. त्यामुळे पोलीस विभागाने आपला ‘मेहनताना’ घेऊ नये, अशी विनंती केली. हुल्लडबाजांना रोखण्याची जबाबदारी सर्व तालीम मंडळे घेतील. यापुढे मैदानात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, असे आमच्यातर्फे अभिवचन देतो. पोलीस प्रशासनाच्यावतीने पोलीस उपअधीक्षक अनिल पाटील (गृह), पोलीस उपअधीक्षक अमरसिंह पाटील, पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते उपस्थित होते.
यावेळी केएसए पदाधिकारी राजेंद्र दळवी, सरदार मोमीन, नीलराजे बावडेकर, मनोज जाधव, नगरसेवक विजय खाडे-पाटील, शशिकांत नलवडे, त्रिवेंद्र नलवडे, रावसाहेब सरनाईक, सुधाकर पाटील, मिथुन मगदूम, योगेश चौगुले, प्रमोद भोसले, सुहास साळोखे, दिग्विजय मुळे, सुदर्शन भोसले, चंद्रकांत जांभळे, युवराज पाटील, अमर पाटील, गौरव कुराडे, राजेंद्र वायचळ आदी उपस्थित होते.
नो बंदोबस्त
पोलीस अधीक्षक देशपांडे यांनी यंदाच्या हंगामाकरिता आम्ही पोलीस बंदोबस्त देत नाही. स्वत:च्या जबाबदारीवरच तुम्ही सामने घ्यावयाचे आहेत. जुना राजवाडा पोलीस निरीक्षक केवळ सामने पाहण्यास येतील. जास्त अटीतटीचे सामने असतील त्यावेळी मी हे सामने पाहण्यास येईन. त्यामुळे पोलिसांच्या वाजवी निर्देशांचे पालन करा. मग कशाला लागेल बंदोबस्त, अशी विचारणा करत त्यांनी हसतच सर्वांसमोर ‘नो बंदोबस्त’ असे सांगितले. त्यांच्या या फिरकीने उपस्थित काही काळ गोंधळले.
पोलीस अधीक्षक म्हणाले...
यंदाच्या हंगामात फुटबॉल संघाचे समर्थक, खेळाडूंनी हुल्लडबाजी होणार नाही याबाबत आपल्या समर्थकांत जागृती करावी
आम्ही या शतकाकडे निघालेल्या वैभवी फुटबॉल परंपरेला अडथळा निर्माण करणार नाही.
यंदाचा हा फुटबॉल हंगाम इतका चांगला करू की, राज्यात कोल्हापूरचे नाव होईल.
सर्व अटी, शर्ती लागू करूनच या हंगामास मी परवानगी देत आहे.
नो बंदोबस्त
पोलीस अधीक्षक देशपांडे यांनी यंदाच्या हंगामाकरिता आम्ही पोलीस बंदोबस्त देत नाही. स्वत:च्या जबाबदारीवरच तुम्ही सामने घ्यावयाचे आहेत. जुना राजवाडा पोलीस निरीक्षक केवळ सामने पाहण्यास येतील. जास्त अटीतटीचे सामने असतील त्यावेळी मी हे सामने पाहण्यास येईन. त्यामुळे पोलिसांच्या वाजवी निर्देशांचे पालन करा. मग कशाला लागेल बंदोबस्त, अशी विचारणा करत त्यांनी हसतच सर्वांसमोर ‘नो बंदोबस्त’ असे सांगितले. त्यांच्या या फिरकीने उपस्थित काही काळ गोंधळले.