अकरावीच्या तिसऱ्या फेरीला अत्यल्प प्रतिसाद
By admin | Published: July 16, 2016 01:13 AM2016-07-16T01:13:46+5:302016-07-16T01:13:46+5:30
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील अकरावीचा तिसऱ्या फेरीतून आॅनलाइन प्रवेश घेण्याची आज अंतिम तारीख होती. अद्याप प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १८०७६ इतकी होती
पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील अकरावीचा तिसऱ्या फेरीतून आॅनलाइन प्रवेश घेण्याची आज अंतिम तारीख होती. अद्याप प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १८०७६ इतकी होती. मात्र त्यातील केवळ ८५०२ विद्यार्थ्यांनीच कला, वाणिज्य व विज्ञान या विभागांत प्रवेश घेतल्याने या फेरीला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.
याबाबत पुणे विभागाच्या सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत म्हणाल्या, ‘‘शुक्रवारी अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशाची अंतिम यादी जाहीर झाली. तिसऱ्या यादीत ७ हजार ३७३ विद्यार्थ्यांना पसंतीक्रमानुसार वरच्या महाविद्यालयात अर्थात बेटरमेंटची संधी मिळाली आहे. दहावीत चांगले गुण असूनही अकरावीला पसंतीक्रमानुसार महाविद्यालय मिळाले नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार कायम आहेत. प्रवेशाची तिसरी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांचा तक्रारीचा ओघ वाढला आहे. पसंतीक्रमानुसार प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे लेखी अर्ज दिले जात आहेत. मात्र त्याची दखल घेतली जाणार का, याविषयी पालकांनी साशंकता व्यक्त केली जात आहे.
१८ हजार ७६ विद्यार्थ्यांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली असून त्यात ९ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला नसल्याने त्यामुळे हे विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेच्या बाहेर पडले आहेत.
याबरोबरच ४ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले असून १९३ विद्यार्थ्यांनी स्वत:हून आपला प्रवेश रद्द केला आहे. यामध्ये कला शाखेच्या मराठी माध्यमासाठी ४३ जणांनी, तर इंग्रजी माध्यमासाठी ९१ जणांनी प्रवेश घेतला आहे. वाणिज्य शाखेतील मराठी माध्यमासाठी १२३५ जणांनी व इंग्रजी माध्यमातील २५२६ जणांनी प्रवेश घेतला. याबरोबरच विज्ञान शाखेसाठी तिसऱ्या फेरीतून ४६०७ जणांनी प्रवेश घेतला आहे.