मुंबईत ‘स्वाइन’ने घेतला तिसरा बळी

By Admin | Published: May 23, 2017 03:46 AM2017-05-23T03:46:55+5:302017-05-23T03:46:55+5:30

राज्यभरात स्वाइन फ्लूने थैमान घातले असताना मुंबईतही स्वाइन फ्लूमुळे तिसरा बळी गेला आहे. काही दिवसांपूर्वी वरळीतील दीड वर्षीय मुलाचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला होता

The third victim took the swine from Mumbai | मुंबईत ‘स्वाइन’ने घेतला तिसरा बळी

मुंबईत ‘स्वाइन’ने घेतला तिसरा बळी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यभरात स्वाइन फ्लूने थैमान घातले असताना मुंबईतही स्वाइन फ्लूमुळे तिसरा बळी गेला आहे. काही दिवसांपूर्वी वरळीतील दीड वर्षीय मुलाचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला होता. तर कुर्ला येथील ७२ वर्षीय महिलेलाही स्वाइन फ्लूमुळे जिवाला मुकावे लागले. त्यानंतर आता १६ मे रोजी सायन रुग्णालयात भांडुप टिळकनगर येथील ३० वर्षीय गर्भवती महिलेचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
मूळची अलाहाबादची असणारी ही महिला एक महिन्यापूर्वी भांडुप येथे राहण्यास आली होती. ती सात महिन्यांची गर्भवती होती. तिला ब्रॉन्कायल अस्थमा झाल्याचे निदान झाले होते. शिवाय, तिला काही दिवसांपासून कफ, छातीत दुखणे, श्वसनात अडथळा आणि उलट्यांचाही त्रास होत होता. १३ मे रोजी सायंकाळी तिला सावित्रीबाई फुले मॅटर्निटी होममध्ये नेण्यात आले. तेथे तिला सायन रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार त्याच दिवशी सायंकाळी ७.२० वाजता तिला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतर दोन दिवसांनी १६ मे रोजी सकाळी ११ वाजता तिचा मृत्यू झाला.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिकेने भांडुप टिळकनगर परिसरातील ५२५ घरांतील २ हजार २६ व्यक्तींची चाचणी केली असल्याचे सांगितले. गेल्या वर्षी मुंबईत स्वाइन फ्लूचे केवळ ३ रुग्ण आढळले होते, त्यापैकी सर्व बरे झाले होते. मात्र यंदा जानेवारी ते १८ मे दरम्यानच्या कालावधीत मुंबई शहर-उपनगरात ३७ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले, तर ३ मृत्यू झाले आहेत. १ जानेवारी ते ३० एप्रिलपर्यंत राज्यभरात ५००हून अधिक स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले होते. यात १००हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून, ही संख्या पुणे व नागपूरमध्ये सर्वाधिक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मुंबईत स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे सिद्ध होत आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, स्वाइन फ्लूमुळे घाबरण्याचे कारण नाही. स्वाइन फ्लू बरा होणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवा, गर्दीत जाणे टाळा आणि गरज पडल्यास तोंडाला रुमाल बांधा. स्वाइन फ्लूवरील लसीकरण आणि औषधे उपलब्ध आहेत. त्यांचा डॉक्टरांच्या सल्ल्याने उपयोग करा. या साथीदरम्यान गर्भवती, रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयांत गर्भवतींसाठी लसही उपलब्ध करून दिली जात आहे.

Web Title: The third victim took the swine from Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.