मृतसाठा उपसून भागतेय ५० गावांची तहान

By admin | Published: March 3, 2017 01:01 AM2017-03-03T01:01:22+5:302017-03-03T01:01:22+5:30

५० गावांना पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या नाझरे जलाशयातील पाणी पुढील चार महिने टिकवण्यासाठी आतापासूनच नियोजनाची आवश्यकता आहे.

Thirst for 50 villages in the fort | मृतसाठा उपसून भागतेय ५० गावांची तहान

मृतसाठा उपसून भागतेय ५० गावांची तहान

Next


जेजुरी : जेजुरी आणि पुरंदर व बारामती या तालुक्यांतील सुमारे ५० गावांना पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या नाझरे जलाशयातील पाणी पुढील चार महिने टिकवण्यासाठी आतापासूनच नियोजनाची आवश्यकता आहे. मात्र, तसे प्रयत्न होताना दिसत नाही. यामुळे जलाशयावर अवलंबून असणारे नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
पुरंदर आणि बारामती या तालुक्यांतील सुमारे ५० गावांना जेजुरीनजीकच्या नाझरे जलाशयातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. यात जेजुरी शहर, जेजुरी औद्योगिक क्षेत्र, आयएसएमटी कंपनी, तसेच पारगाव माळशिरस व २३ गावे, नाझरे व ५ गावे, तसेच बारामती तालुक्यातील मोरगाव व १६ गावांचा समावेश आहे. या गावांना पुढील ४ महिने पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र, जलसंपदा विभागाकडून याबाबतचे नियोजन झाले नसल्याच्याच तक्रारी आहेत.
नाझरे जलाशयात सध्या १६२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. सुमारे ७८८ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या या जलाशयात गेल्या वर्षी मार्च महिन्यात सुमारे २०० दशलक्ष पाणीसाठा होता. मुळात जलाशयाचा मृत पाणीसाठा २०० दशलक्ष घनफूट आहे. आज मृत साठ्यातूनच या ५० गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे. मृत साठ्यातील पाणी पिण्यास योग्य नसतानाही तहान भागविण्यासाठी त्यातूनच पाणीपुरवठा करावा लागत आहे. योजनांना पाणी, बाष्पीभवन यांमुळे दररोज एक ते दीड दशलक्ष घनफूट पाणी कमी होत आहे. पुढील तीन ते चार महिने पाणी पुरविणे जिकिरीचे बनलेले आहे. यातच उन्हाळाही प्रचंड वाढलेला आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे आहे हेच पाणी जपून वापरावे लागत आहे. यासाठी नाझरेचे नियोजन करण्याची गरज आहे. नाझरे जलाशयावरून पाण्याचे नियोजन केले जात नाही. आजही अनेक अनधिकृत योजना पाणी घेत असल्याच्या तक्रारी आहेत.
या संदर्भात नाझरे शाखाधिकारी एन. सी. नागोसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की जलाशयावरील पाण्याचे नियोजन केलेले आहे.
येत्या १५ जुलैअखेर पाणी पुरविण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जलाशयावरील पिण्याच्या पाण्याच्या योजना, जेजुरी शहर, आयएसएमटी कंपनी व औद्योगिक क्षेत्राला दिवसाआड ८ तास पाणी उचलण्याची परवानगी देण्यात आली आहे. शेती सिंचनाच्या सर्वच्या सर्व योजना बंद केलेल्या आहेत, अशी माहिती दिली आहे.
मात्र, पाणीपुरवठ्याचे नियोजन केलेले असले, तरीही अनेक योजना अजूनही १२ तास पाणी उचलत आहेत. पिण्याचे पाणी राखण्याऐवजी कारखानदारीला दिले जात आहे. या संदर्भात पुरंदरचे तहसीलदार सचिन गिरी यांच्याकडे पत्र देऊन कारखानदारीला विशेषत: आयएसएमटी कंपनीला पाणीपुरवठा बंद करण्याची मागणी पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती माणिक झेंडे पाटील यांनी केलेली आहे.
>गाळमिश्रीत पाणी : अत्यल्प साठा शिल्लक
सध्या नाझरे जलाशयात मृत साठ्यातील अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. गावोगावच्या पाणी योजनांना आताच गाळमिश्रित पाणीपुरवठा होऊ लागला आहे. कारखानदारी, बाष्पीभवन यांमुळे हे पाणी पावसाळ्यापर्यंत पुरणार नाही अशीच स्थिती आहे. त्यासाठी शेती, कारखानदारीला पाणी बंद करणे गरजेचे आहे. हे पाणी केवळ पिण्यासाठीच राखून ठेवणे गरजेचे असल्याचे माणिक झेंडे यांनी सांगितले.

Web Title: Thirst for 50 villages in the fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.