तहानलेला मराठवाडा यंदा झाला तृप्त!
By admin | Published: September 27, 2016 05:32 AM2016-09-27T05:32:44+5:302016-09-27T05:32:44+5:30
तीन वर्षांपासून दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यावर यंदा वरुणराजाने चांगलीच कृपादृष्टी केली असून, परतीच्या धुवाधार पावसामुळे विभागाने सहा वर्षांत दुसऱ्यांदा सरासरी गाठली आहे.
- सुनील कच्छवे, औरंगाबाद
तीन वर्षांपासून दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यावर यंदा वरुणराजाने चांगलीच कृपादृष्टी केली असून, परतीच्या धुवाधार पावसामुळे विभागाने सहा वर्षांत दुसऱ्यांदा सरासरी गाठली आहे. पावसामुळे जमिनीत चांगली ओल आली असून, त्यामुळे रब्बी हंगामात पिकांखालील क्षेत्र वाढणार आहे.
तीन वर्षांपासून मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरविली होती. दुष्काळामुळे शेतीच्या उत्पन्नात मोठी घट झाली. यंदा मात्र समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. मराठवाड्यात आतापर्यंत सरासरी ९९.६७ टक्के पाऊस झाला आहे. मराठवाड्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान हे ७७९ मि.मी. इतके आहे. त्या तुलनेत विभागात आतापर्यंत ७७६ मि.मी. पाऊस झाला आहे. १३ वर्षांत २०१० हे मराठवाड्यात सर्वाधिक पावसाचे वर्ष राहिले. तेव्हा वार्षिक सरासरीच्या तुलनेत तब्बल १२५ टक्के पाऊस झाला होता. त्यानंतरची दोन वर्षे पुन्हा विभागात मोठी तूट होती. २०१३मध्ये ११० टक्केपाऊस झाला. पुढची दोन वर्षे पुन्हा सरासरी केवळ ५० ते ५५ टक्के एवढाच पाऊस झाला.
विभागात रब्बी पिकांखालील सरासरी क्षेत्र २० लाख ७७ हजार हेक्टर एवढे आहे. दोन वर्षांत अपुऱ्या पावसामुळे त्यातील निम्म्या क्षेत्रावरही पेरा झाला नव्हता. यंदा हे क्षेत्र निश्चितच वाढणार आहे.
औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये रब्बीचे क्षेत्र ८ लाख ६४ हजार एवढे आहे. ते ८ लाख ९९ हजार हेक्टरवर जाण्याची अपेक्षा विभागीय कृषी अधीक्षक पंडित लोणारे यांनी व्यक्त केली.
‘मांजरा’चे सहा दरवाजे उघडले
बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांना वरदान ठरलेले मांजरा धरण चार वर्षांनंतर १०० टक्के भरले असून, सोमवारी धरणाचे
१८पैकी ६ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. ‘मांजरा’खालील २० गावांत पूरस्थिती असून त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तावरजा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून त्याचे तीन दरवाजे उघडले आहेत. तीन वर्षांपासून प्रकल्प कोरडा होता.
लातूरला सर्वाधिक पाऊस!
दुष्काळाचे चटके सहन करावे लागलेल्या लातूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे वार्षिक सरासरीच्या ११४ टक्के तर बीड जिल्ह्यात १०९ टक्के पाऊस झाला.
१२ वर्षांत ५ वेळा सरासरी :
बारा वर्षांत केवळ पाच वेळा मराठवाड्यात सरासरी एवढा किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस झाला आहे.