खड्ड्यातील पाण्याने भागते तहान

By admin | Published: May 4, 2017 05:35 AM2017-05-04T05:35:27+5:302017-05-04T05:35:27+5:30

विक्रमगड या तालुक्यातील चिंचपाडा या ७०० आदीवासी लोकसंख्या असलेल्या गावाची तहान सध्या खड्ड्यातील गढूळ पाण्याने भागविली

The thirsty thunders with water | खड्ड्यातील पाण्याने भागते तहान

खड्ड्यातील पाण्याने भागते तहान

Next

विक्रमगड : या तालुक्यातील चिंचपाडा या ७०० आदीवासी लोकसंख्या असलेल्या गावाची तहान सध्या खड्ड्यातील गढूळ पाण्याने भागविली जाते आहे. या गावाला तीनही बाजूने डोंगर-दऱ्यांनी वेढलेले आहे. एका बाजुस सजन येथील लघु पाटबंधारे प्रकल्प आहे. ़हे गाव खोस्ते ग्रामपंचायत हद्दीत येते़ मात्र ते गेल्या अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतिक्षेत असून सरकारी यंत्रणा व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे त्यांना मूलभूत सुविधा मिळणेही कठीण होऊन बसले आहे़ येथे पिण्याच्या पाण्याची ही गंभीर समस्या असून आजही येथील लोक डॅमच्या किना-यावर खडडे पाडून त्यातील पाणी वापरुन आपली तहान भागवितात.
या गावात जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी केंद्र सुरु केले आहे़. इयत्ता पहिली ते चौथी पर्यत शाळा असून विद्यार्थ्यांकरीता पिण्याच्या पाण्याची सोय नाही़ उंच भाग असल्याने बोअरवेलला पाणीच नाहीे़
अशीच परिस्थिती येथील आदिवासी रहीवाशांचीही आहे़ हे गाव खोस्ते ग्रामपंचायत हद्दीत येते मात्र या गावाच्या विकासाकडे कुणीही अद्यापही लक्ष दिलेले नसल्याचा आरोप येथील रहीवासी वारंवार करीत आलेले आहेत. गावाच्या एका बाजूला सजन लघुबंधारां आहे. त्यात गावातील काही लोकांच्या जमीनी गेल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले,असे असतांना सध्या या गावात पाणी पुरवठा योजना नाही़ या गावासाठी एक विहीर असुन ती ही जानेवारी महिन्यात तळ गाठते़
त्यामुळे येथील महिलांना बंधा-याच्या शेजारी खड्डे खोदून दुषित पाणी भरावे लागत आहे, त्यावरच त्यांना आपली तहान भागवावी लागते आहे़ या खड्डयातील माती मिश्रीत पाण्यामुळे संसर्गजन्य रोगांची साथ पसरण्याची शक्यता आहे. ती उद्भवल्यानंतर त्यात काहींची बळी गेल्या नंतरच संबंधीत यंत्रणेला जाग येईल का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडुन केला जात आहे़
त्याचप्रमाणे गावात परीवहनाची मोठी समस्या असून गावात कुठल्याही प्रकारच्या वाहनांची व्यवस्था नाही. वाहन मिळविण्यासाठी येथील ग्रामस्थांना ४ ते ५ किलोमीटरची पायपिट करावी लागते आहे़ गावात कोणत्याही प्रकारचा रोजगार नसून त्यांना स्थलांतरीत होऊन मजुरी किंवा गवंडी काम करुन गुजराण करावी लागत आहे़
या गावात महावितरणाची (विजेची) व्यवस्था आहे़मात्र ती नियोजनबध्द नसून कमी दाबामुळे बल्बही काजव्यासारखे लुकलुकत आहेत तर शेतीला पंपाद्वारे पाणी देता येत नसल्याने पिकाचेही नुकसान सहन करावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
त्यामुळे स्थानिक आमदार, खासदार व शासकीय संत्रणेने लक्ष केद्रींत करुन या गावाला पुरविण्यांत येणा-या सोई सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यात सुधारणा घडवून आणावी अशी मागणी येथील आदिवासी ग्रामस्थ करीत आहेत़. जर या समस्या लवकर सोडविण्यात आल्या नाही तर त्यासाठी आंदोलन करण्याची तयारीही आदीवासींनी केली आहे. त्याकडे यंत्रणेचे लक्ष कधी वेधले जाणार? (वार्ताहर)

निधी खर्च योजना अपूर्णच

ओंदे ग्रामपंचायत अंतर्गत वाढीव कॉस्ट नुसार ५६लाखांची पाणी योजना सन-२०११ मध्ये मंजूर करण्यात आलेली आहे़ व या योजनेमध्ये चिंचपाडा-खोस्ता यांनाही जोडण्यात आलेले आहेत़

परंतु ही योजना अदयापही पूर्णत्वास गेलेली नसल्याने खांड-उघाणीपाडा व खोस्ते-चिंचपाडावासियांना तीचा फायदा झालेला नाही. या परीसरात एक तर योजना मंजूर होत नाहीत व झाल्या तर त्यामध्ये सावळा-गोंधळ होत असल्याने याचा फटका रहिवाशांना बसत आहे़

या योजनेसाठी ४६ लाख ६४ हजाराचा निधी मंजूर झाला त्यापैकी ३९ लाख ८८ हजार खर्च झाले आहेत़ मात्र या पाण्याची टाकी, पाईपलाईन, अशी कामे अदयापही अपूर्ण आहेत, मग हा निधी खर्च तरी कोठे झाला? असा सवाल उपस्थित केला जात आहे़ त्यामुळे आमच्यासाठी खोस्ते ग्रामपंचायत अंतर्गत स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर करावी, अशी मागणी येथील रहीवाशांनी केली आहे़

Web Title: The thirsty thunders with water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.