तेरावी प्रवेश ८ जूनपासून..?
By Admin | Published: June 5, 2016 12:42 AM2016-06-05T00:42:30+5:302016-06-05T00:42:30+5:30
तेरावी प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त मिळाला असून ८ जूनपासून तेरावी प्रवेश सुरु होईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आल्याने अॅडमिशनची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
मुंबई : तेरावी प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त मिळाला असून ८ जूनपासून तेरावी प्रवेश सुरु होईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आल्याने अॅडमिशनची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
बारावीचा निकाल लागल्यानंतर अगदी काहीच दिवसात तेरावीसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू होते. पण यंदा दहा दिवस उलटूनही अॅडमिशन सुरु होण्याची चिन्ह दिसत नव्हती. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यंदा तेरावी प्रवेश आॅनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या‘एमकेसीएल’ कंपनीबाबत अनेक तक्रारी संघटनांकडून आल्या होत्या. मात्र आता नव्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यापीठाकडे कंपन्यानी चार नव्या निविदा सादर केल्या आहेत. या बाबतीतील विचार अंतिम टप्प्यात असून या निविदांबाबत सोमवारी होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नव्या कंपनीची नेमणूक करण्यात येत असून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. ए. खान यांनी सांगितले.
आवडीचे महाविद्यालय मिळेल
तेरावी आॅनलाईन रजिस्ट्रेशनमध्ये दहा महाविद्यालयांची नावे द्यावी लागतात. यातील आवडत्या दहा महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही तर विद्यार्थ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करावे लागते. शिवाय तीन लिस्टपर्यंत विद्यार्थ्यांच्या रजिस्ट्रेशनची मुदत संपते. प्रवेशासाठी आॅनलाईन रजिस्ट्रेशन अनिवार्य असल्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता होती. यावर उपाय म्हणून ‘अदर कॉलेज’ असा पर्याय देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. युवा सेनेचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी यासंबधी निवेदन दिले होते.