राज्यभरात अपघातांत तेरा ठार, मुंबई-पुणे मार्गावर तिघांचा बळी; खान्देशातील पाच, नाशकातील चौघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 04:01 AM2017-10-17T04:01:22+5:302017-10-17T04:01:37+5:30
राज्यभरात गेल्या चोवीस तासांत विविध ठिकाणी झालेल्या अपघातांत तब्बल १३ जण ठार झाले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघातात तिघे, जळगावातील अपघातात तिघे, नंदुरबारमधील अपघातात दोघे, अकोल्यातील अपघातात एक जण, तर नाशकातील अपघातात चौघे ठार झाले आहेत.
मुंबई : राज्यभरात गेल्या चोवीस तासांत विविध ठिकाणी झालेल्या अपघातांत तब्बल १३ जण ठार झाले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघातात तिघे, जळगावातील अपघातात तिघे, नंदुरबारमधील अपघातात दोघे, अकोल्यातील अपघातात एक जण, तर नाशकातील अपघातात चौघे ठार झाले आहेत.
मुंबई-पुणे दु्रतगतीमार्गावर बोरज गावाजवळ नादुरूस्त खासगी बसला मागून भरधाव आलेल्या ट्रकने सोमवारी सकाळी सातच्या सुमारास जोरदार धडक दिली.
यात ठाण्यातील तिघे ठार, तर सात जण जखमी झाले. साहिल पवार (१६), तानाजी नाईकवाडे (३५), उमेश नाईकवाडे (२२, सर्व रा. ठाणे; मूळ चरणगाव, ता. शिराळा, जि. सांगली) अशी मृतांची नावे आहेत. यात ट्रकचालक आहुल बाबू (३८, रा. चेन्नई) जखमी झाला असून, त्याच्यावर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तसेच जळगावातील चोपडानजीक वडतीफाटा ते मालचा फाट्यादरम्यान रविवारी रात्री १० च्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. त्यात हनुमंत पाटील, केशरसिंग पाटील (रा. माचला, ता.चोपडा) तसेच योगेश सुतार (रा.खंडेराव नगर, जळगाव) हे तिघे जागीच ठार झाले. तर अनिल कोळी व गोकुळ भोई (रा.जळगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत.
दुसºया घटनेत सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास नंदुरबारमधील शहादा-प्रकाशा रस्त्यावर मनरदनजीक भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने भूषण गुरव (१७) व शुभम गुरव (१७, दोन्ही रा. प्रकाशा ता. शहादा) हे दोन विद्यार्थी जागीच ठार, तर महेश गुरव (१७) हा जखमी झाला.
त्याचबरोबर नाशिक-पुणे रोडवरील अंधशाळा बसस्टॉपजवळ रविवारी मध्यरात्री भरधाव कार झाडावर आदळून भीषण अपघात झाला.
त्यात चौघे ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला असून मृतांमध्ये रिपाइं(ए)च्या युवती जिल्हाध्यक्ष प्रीती अनिल भालेराव यांचा समावेश आहे़ या कारमध्ये एकूण सहा जण होते़ त्यापैकी प्रीती (३५), पूजा भोसले (३०), निशांत बागुल (३०) व सूरज गिरजे या चौघांचा जागीच मृत्यू झाला़ तर कारचालक आनंद मोजाड व रितेश विश्वकर्मा हे गंभीर जखमी झाले आहेत़
तसेच, अकोल्यातील पातूर-बाळापूर मार्गावर सोमवारी दुपारी भरधाव ट्रकने समोरून येणाºया दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार श्रीकृष्ण म्हैसने (४४) हे जागीच ठार झाले. या वेळी ट्रक उलटल्याने पायी जात असलेले विष्णू गोविंद घोगे गंभीर जखमी झाले आहेत.
औरंगाबादेत दोन अपघातांत चार ठार
ब्रेक अचानक फेल झाल्याने बीडकडे निघालेल्या भरधाव एसटी बसने तीन रिक्षा, एक दुचाकी आणि कारला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील दोघे जागीच ठार, तर ़रिक्षाचालकांसह आणखी एक जखमी झाला. सोमवारी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास सिडकोतील वसंतराव नाईक चौकात ही भीषण दुर्घटना घडली. संजय म्हसूजी जाधव (४०, रा. बेगमपुरा) आणि बालाजी ढंगारे (४०, रा. सनी सेंटर, पळशी रोड) अशी मृतांची नावे आहेत.
दुसºया घटनेत दिवाळीसाठी गावाकडे जाणाºया मित्रांच्या कारला समोरून वेगात आलेल्या कंटेनरने जोराची धडक दिली. बीड रोडवरील भालगाव फाट्याजवळ रविवारी रात्री झालेल्या या अपघातात अमित पाटील (३०, रा. मुगाव, ता. निलंगा, जि.लातूर) आणि डॉॅ. हरिकिशन पाटील (३५, जि.बीदर, कर्नाटक) या दोघांचा मृत्यू, तर एक जण जखमी झाला.