तेरा वर्षाच्या मुलीला सहा लाखाला विकत घेऊन केले लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2016 05:02 PM2016-07-25T17:02:27+5:302016-07-25T17:02:27+5:30
महिनोनमहिने निमूटपणे अत्याचार सहन केल्यानंतर 'तिने' अखेर हिम्मत करुन कशीबशी स्वत:ची त्या घरातून सुटका करुन घेतली आणि तडक नालासोपारा पोलिस चौकी गाठली.
Next
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. २५ - महिनोनमहिने निमूटपणे अत्याचार सहन केल्यानंतर 'तिने' अखेर हिम्मत करुन कशीबशी स्वत:ची त्या घरातून सुटका करुन घेतली आणि तडक नालासोपारा पोलिस चौकी गाठली. मोठया शहरात इतक्या भीषण परिस्थितीतून गेल्यानंतर तिच्या मनात एक धास्ती भरली होती. जी तिच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होती.
पोलिसांनी या मुलीला धीर दिल्यानंतर त्या मुलीने जे सांगितले त्याने क्षणभरासाठी पोलिसही स्तबद्ध झाले. ही मुलगी १३ वर्षांची असून कागदोपत्री या मुलीचे वय २० दाखवून तिला विकण्यात आले. लाचाराम क्रिपाराम चौधरी या इसमाने तिला सहा लाखांना विकत घेतले. या मुलीला विकत घेतल्यानंतर लाचारामने तिच्याशी लग्न केले व तिला नालासोपारा येथे घेऊन आला.
त्याने नालासोपा-यातील एका खोलीत या मुलीला बंधक बनवून ठेवले होते. १० महिने लाचारामने या मुलीचे लैंगिक, शारीरीक आणि मानसिक शोषण केले. ही मुलगी निमूटपणे हा अत्याचार सहन करत होती. अखेर लाचारामचा जाच सहन करणे असहय झाल्यावर तिने कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेत संतोष भवन बीट चौकी गाठली.
पीडित मुलीच्या आईचे निधन झाल्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. वडिलांच्या मृत्यूनंतर सावत्र आईबरोबर रहाण्याशिवाय या मुलीकडे दुसरा पर्याय नव्हता. शांती या सावत्र आईने मुलीला चौधरीला सहा लाख रुपयांना विकले. कायद्याच्या अडचणी टाळण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर शांतीने या मुलीचे वय वीस दाखवले.
यापूर्वी शांतीने पीडित मुलीची पैशांसाठी दोनवेळा विक्री केली होती. शनिवारी संध्याकाळी पीडित मुलीला पुन्हा पैशांसाठी तिची विक्री होणार असल्याचे समजले म्हणून तीने या सर्वातून आपली सुटका करुन घेण्यासाठी पोलिसात धाव घेतली. अधिक तपासातून मानवी तस्करीची मोठी साखळी समोर येईल असा पोलिसांना विश्वास आहे.