आमदारांच्या घरासमोर आज घंटानाद
By admin | Published: November 3, 2015 03:02 AM2015-11-03T03:02:07+5:302015-11-03T03:02:07+5:30
गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात आलेल्या पाण्याबाबत सत्ताधारी भाजपा आमदारांनी साधलेली चुप्पी आणि भाजपा सरकारकडून प्रशासनावर वाढता दबाव याच्या निषेधार्थ मंगळवारी
नाशिक : गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात आलेल्या पाण्याबाबत सत्ताधारी भाजपा आमदारांनी साधलेली चुप्पी आणि भाजपा सरकारकडून प्रशासनावर वाढता दबाव याच्या निषेधार्थ मंगळवारी येथील भाजपा आमदारांच्या घरासमोर घंटानाद करत त्यांना ‘जागते व्हा’चा इशारा देण्याचा निर्णय रात्री उशिरा झालेल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या बैठकीत झाला. पाणीप्रश्नी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी व नाशिककरांचा मोर्चा काढण्याबरोबरच नागरिकांमध्ये जागृती करण्याचेही निश्चित करण्यात आले.
आंदोलनाची रणनीती ठरविण्यासाठी महापौरांच्या ‘रामायण’ निवासस्थानी रात्री उशिरा बैठक झाली. महापौर अशोक मुर्तडक, आ. अनिल कदम, आ. जयंत जाधव, उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंभळे, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, मनसेचे शहराध्यक्ष राहुल ढिकले, सभागृह नेते सलीम शेख, विरोधी पक्षनेत्या प्रा. कविता कर्डक, मनसेचे गटनेते अनिल मटाले आदी बैठकीला उपस्थित होते. पाणीप्रश्नी सारे शहर तापले असताना सत्ताधारी भाजपा आमदारांनी सोयीस्कर मौन स्वीकारल्याचे सर्वपक्षीयांनी सांगितले. (प्रतिनिधी)
...तर दोन-तीन दिवसाआड पाणी
गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने धरणातील पाणीसाठा कमी होणार आहे. त्याचा परिणाम शहरातील पुरवठ्यावर होईल. सद्यस्थितीत महापालिकेने ९ आॅक्टोबरपासून पाणीकपात करत एकवेळ पाणी पुरवठा केला आहे. पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे काही दिवसांत शहराला दोन-तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ येऊ शकते, असे महापौर म्हणाले.