सराफाच्या दुकानात तीस लाखांची चोरी
By admin | Published: April 28, 2016 02:49 AM2016-04-28T02:49:34+5:302016-04-28T02:49:34+5:30
मालाडच्या कुरार परिसरात मंगळवारी सराफाच्या दुकानाचे छप्पर तोडून सुमारे तीस लाखांचा ऐवज लंपास झाल्याची घटना घडली.
मुंबई : मालाडच्या कुरार परिसरात मंगळवारी सराफाच्या दुकानाचे छप्पर तोडून सुमारे तीस लाखांचा ऐवज लंपास झाल्याची घटना घडली. या प्रकरणी कुरार पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे.
कुरारच्या शिवाजीनगर परिसरातील श्रीजी ज्वेलर्सच्या दुकानात रात्री अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. कुरार पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, दोन चोर दुकानाचे छप्पर तोडून या दुकानात शिरले. त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा बंद केला. त्यानंतर सोने आणि चांदीचे दागिने घेऊन पळ काढला. एक किलो सोने, वीस किलो चांदी आणि ६० हजारांची रोकड या चोरांनी पळविल्याचे दुकानाचे मालक रमेशचंद्र सोनी यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, दुकानासमोरील रस्त्यावर असलेल्या एका सीसीटीव्हीचे चित्रीकरण पोलीस तपासत आहे, ज्यात दोन चोर दुकानात शिरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मुख्य म्हणजे स्थानिकांची वर्दळ घटनास्थळी असून, एक दुधाची गाडी नेमकी तिथे आल्याचे चित्रीकरणात आढळले आहे. याच वेळी दुकानातून आवाजही येत होता. तरीदेखील कोणीही पोलिसांना याबाबत कळविण्याची तसदी घेतली नाही, अन्यथा चोरांना पकडता आले असते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
दुकानासमोरील रस्त्यावर असलेल्या एका सीसीटीव्हीचे चित्रीकरण पोलीस तपासत आहे, ज्यात दोन चोर दुकानात शिरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे हे फुटेजच पोलिसांना काहीतरी धागेदोरे मिळवून देईल, अशी शक्यता आहे.