तीस गुंठ्यांत तीन लाखांची वांगी
By admin | Published: June 10, 2016 01:52 AM2016-06-10T01:52:33+5:302016-06-10T01:52:33+5:30
येथील भानुदास तांबे व पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन कृष्णा तांबे या दोन भावांनी आजही शेती जोमाने करतात.
रहाटणी : येथील भानुदास तांबे व पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन कृष्णा तांबे या दोन भावांनी आजही शेती जोमाने करतात. सध्या त्यांनी ३० गुंठे जमिनीत सुमारे ३ लाखांचे वांग्याचे उत्पन्न काढले आहे. पाण्याचा मोठ्या प्रमाणात दुष्काळ असतानासुद्धा या दोन भावंडांनी आधुनिक पद्धतीने शेती करून शेतकऱ्यांपुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.
रहाटणी, काळेवाडी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव या उपनगरातील शेती व्यवसायाला उतरती कला लागली. अनेक शेतकरी पैशाच्या मोहापायी अनेक शेतकरी मिळेल त्या किमतीत जमिनी विकू लागले. काहींनी जिल्ह्याच्या बाहेर जमिनी घेतल्या. मात्र, पुन्हा ते शेतकरी झाले नाहीत.
आजही तांबे बंधू रोज उठून सकाळ, संध्याकाळ शेतात असतात. परिसरातील त्यांची आहे तेवढी जमीन जशीच्या तशी आहे. शेतीच करतात. सर्व प्रकारचे उत्पन्न ते घेतात. सध्या राज्यासह या ठिकाणीही पाण्याचा तुटवडा असल्याने त्यांनी आधुनिक पद्धतीची शेती करीत आहेत. ठिबक सिंचन पद्धतीने गावरान वांगीचे उत्पन घेत आहेत . वेळेवर पाणी, औषध व सेंद्रिय खतावर त्यांनी ही शेती करीत आहेत. मागील तीन महिन्यांपासून हे वांगी उत्पन्न सुरू आहे. आणखी काही महिने उत्पन्न सुरू राहणार असून, त्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. वांग्याचा रोजच्या रोज तोडा करून पुणे किंवा पिंपरी भाजी मंडईत विक्रीस नेले जाते. परिसरात पाहावे तिकडे सिमेंटचे डोंगर दिसत असताना फुललेली शेती व भरघोस वांगी उत्पन्न हा या परिसरातील चर्चेचा विषय ठरला आहे. (वार्ताहर)
शेती हा आमचा पूर्वजात व्यवसाय आहे. त्यामुळे आम्हाला हे नवीन नाही. पूर्वी अमाप पाऊस होत होता. त्यामुळे कधी पाण्याची टंचाई जाणवत नसे. पाहिजे तेव्हा पाणी मिळत असे. मात्र, सध्या पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेती करणे अनेकांना जिकिरीचे झाले आहे. मात्र, कमी पाण्यात आधुनिक पद्धतीने शेती केली, तर चांगल्या प्रकारचे उत्पन्न काढता येते. शेतकऱ्यांनीही काळानुसार बदलण्याची आवश्यकता आहे.
- कृष्णा तांबे, शेतकरी