दररोजची तीस लाखांची उलाढाल ठप्प

By admin | Published: May 20, 2015 09:32 PM2015-05-20T21:32:17+5:302015-05-21T00:08:00+5:30

यंत्रमाग कारखान्यांवर परिणाम नाही : किमान वेतनाच्या मागणीसाठी इचलकरंजीतील ७० टक्के सायझिंग कारखाने बंद

Thirty lakhs of turnover jumped daily | दररोजची तीस लाखांची उलाढाल ठप्प

दररोजची तीस लाखांची उलाढाल ठप्प

Next

इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतनासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या फेररचनेप्रमाणे वेतन मिळण्याच्या मागणीसाठी मुंबई येथे मंत्रालयावर आज, बुधवारी मोर्चा असताना सायझिंग कामगार संपावर गेले असून, शहरातील शंभरहून अधिक सायझिंग कारखाने बंद पडले आहेत. तर या आंदोलनाचा यंत्रमाग कारखान्यांवर फारसा परिणाम झाला नसल्याने येथील वस्त्रोद्योगात आश्चर्य व्यक्त होत आहे.सायझिंग कारखाने बंद पडल्याने दररोज पाच हजार सूत बिमांचे उत्पादन ठप्प झाले आहे. तर बाजारातील रोजची तीस लाख रुपयांची उलाढाल थंडावली आहे. आणखीन दोन दिवस सायझिंग कारखाने सुरू होणार नसल्याची भीती व्यक्त होत आहे.
सन १९८६ नंतर यंत्रमाग कामगार किमान वेतनाची फेररचना शासनाने जाहीर केली नव्हती. परिणामी २९ वर्षे या क्षेत्रातील अनेक कामगार संघटनांनी विविध आंदोलने केली. अखेर लालबावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेच्यावतीने प्रा.ए.बी. पाटील यांनी नोव्हेंबर २०१४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. न्यायाधीश मोहीत शहा व न्या. कुलाबावाला यांच्यासमोर सुनावणी होऊन त्यांनी २ फेब्रुवारी २०१५ पूर्वी यंत्रमाग कामगार किमान वेतनाची फेररचना ३० जानेवारीपूर्वी करावी, असे आदेश दिले. त्याप्रमाणे २९ जानेवारीला शासनाच्या उद्योग व कामगार मंत्रालयाने यंत्रमाग कामगार किमान वेतनाची फेररचना जाहीर केली.
शासनाने किमान वेतनाची फेररचना जाहीर करताना राज्यात महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामीण अशी तीन परिमंडले व कुशल, अर्धकुशल व अकुशल अशी कामगारांची वर्गवारी जाहीर केली. त्यासाठी महापालिका क्षेत्रात नऊ हजार ते दहा हजार शंभर, नगरपालिका क्षेत्रात साडेआठ हजार ते साडेनऊ हजार आणि ग्रामीण क्षेत्रासाठी साडेसात हजार ते साडेआठ हजार असे किमान वेतन जाहीर करण्यात आले. या फेररचनेप्रमाणे शासनाने यंत्रमाग कारखानदारांना वेतन देण्यास भाग पाडावे, यासाठी सुद्धा राज्यातील यंत्रमाग केंद्रांमधून नुकतेच मोर्चे, घेराव अशी आंदोलने व कामगार परिषदा झाल्या. आज याच मागणीसाठी मुंबई येथे आझाद मैदानावर राज्यातील यंत्रमाग कामगारांचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
यंत्रमाग कामगारांच्या मोर्चासाठी इचलकरंजीतील सायझिंग क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने गेले आहेत. काल, मंगळवारपासून ७० टक्के सायझिंग कारखाने बंद पडले आहेत. या मोर्चाचा यंत्रमाग कारखान्यांवर फारसा परिणाम झाला नसल्याने यंत्रमाग कामगारांनी का प्रतिसाद दिला नाही, याचेच आश्चर्य येथे व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)


दहा कोटींच्या कापडाची वाहतूक बंद होण्याच्या मार्गावर
इचलकरंजीत तयार होणाऱ्या यंत्रमाग कापडापैकी सुमारे दहा कोटी रुपयांचे कापड दररोज बालोत्रा (राजस्थान) येथे पुढील प्रक्रियेसाठी जाते. मात्र, बालोत्रा येथील कापडावर प्रक्रिया करणारे प्रोसेसर्स कारखाने प्रदूषणामुळे बंद ठेवण्यात आले आहेत. परिणामी, रोजचे जाणारे पंधरा ट्रक कापडाची वाहतूक बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आज शहरातील कापड बाजारात पॉपलीन व मलमल कापडाचे भाव एकदमच उतरल्याने खळबळ उडाली.

Web Title: Thirty lakhs of turnover jumped daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.