वारीच्या मार्गावरील ३० हजार शौचालय ताब्यात : बबनराव लोणीकर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 11:49 AM2019-06-29T11:49:49+5:302019-06-29T11:55:20+5:30
वारीमध्ये स्वच्छता राहावी आणि कलाकारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जनजागृती करणे हा मुख्य उद्देश आहे.
पुणे : श्री क्षेत्र, देहू, आळंदी ते पंढरपूरपर्यंत वारीच्या मार्गावर ३० हजार शौचालय आपण ताब्यात घेतली आहेत. तसेच निर्मल वारी अभियानातून १६०० फिरत्या शौचालय उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे स्वच्छता, आरोग्याचा कोणताही प्रश्न पालखीत निर्माण होणार नाही. तसेच संपूर्ण पालखी सोहळ्यादरम्या ३०० किर्तनकारांच्या माध्यमातून स्चछतेसाठी जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडीचा शुभारंभ बबनराव लोणीकर यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय येथे करण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बोधले व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे उपस्थित होते.
लोणीकर म्हणाले, वारी मार्गातील प्रत्येक गावागावातील खासगी व शासकीय अशी ३० हजार शौचालये, तसेच संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात अनुक्रमे ९०० आणि ७०० असे एकूण १६०० फिरती शौचालय देण्यात आली आहेत. त्यामुळे महिला-पुरूष वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हा परिषदेचा आरोग्य आणि पाणीपुरवठा, स्वच्छता विभाग यासाठी प्रत्यक्ष नियोजन करून काम करत आहे. त्याचबरोब विविध कंपन्यांच्या (सीएसआर) फंडातून अनेक गावांत शौचालय देण्यात येत आहेत. त्याचा फायदा वारकऱ्यांना होणार आहे.
वारीमध्ये स्वच्छता राहावी आणि कलाकारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जनजागृती करणे हा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी अनेक जिल्ह्यातील प्रचार रथ यासाठी काम करत आहेत. स्वच्छतेचे महत्त्व, रोगराईबाबत जनजागृती भारूड, किर्तनातून करण्यात येत आहे. त्याचबरोबर मोबाईल टॉयलेटचा वापर जास्तीत जास्त व्हावा यासाठी देखील जनजागृती करण्यात येत आहे. पर्यावरण रक्षणासाठी वारी मार्गावर वृक्षलागवड करण्यासाठीही उपक्रम सुरू आहे.
............
घरा-घरांत शौचालय उभारणीचे काम पूर्ण
राज्यातील ३ कोटी नागरिक पूर्वी रस्त्यावर शौचालयासाठी जात होते. तसेच ७० लाख लोकांच्या घरी शौचालयाची व्यवस्था नव्हती. मात्र मागील ४ वर्षांत राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात काम केले आहे. त्यामुळे आज प्रत्येकाच्या घरात ही सुविधा पोहोचल्या आहेत. सर्वांना स्वच्छतेचे महत्त्व पटायला लागले आहे, असे बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले.