हे सरकार फेस टू फेस जातं, फेसबुकवर बोलणारं नाही; देवेंद्र फडणवीसांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 02:06 PM2023-08-17T14:06:30+5:302023-08-17T14:07:04+5:30
सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. पूर्ण ताकदीने सरकार तुमच्या पाठिशी उभे राहील असं त्यांनी सांगितले.
शिर्डी – काहींच्या पोटात मळमळ आहे, काहींच्या पोटात वळवळ आहे. अशा अनेक गोष्टी चाललेत. ३६ जिल्ह्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम होईल. ३६५ दिवस लोकांच्या दारापर्यंत आमचे सरकार जात राहील. हे लोकांपर्यंत जाणारे सरकार आहे. बंददाराआड बसणारे सरकार नाही. हे फेस टू फेस बोलणारं सरकार आहे. फेसबुकवर बोलणारं सरकार नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही जनतेपर्यंत पोहचलोय, अजून पोहचणार आहोत. त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणार आहोत. नवीन सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात अनेक योजना आणल्या. नमो शेतकरी योजनेतून केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून १२ हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे. आज दुर्दैवाने दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळते. परंतु सरकार पीक विम्याच्या माध्यमातून सर्व गोष्टी शेतकऱ्यांकडे पोहचणावर आहोत. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. पूर्ण ताकदीने सरकार तुमच्या पाठिशी उभे राहील असं त्यांनी सांगितले.
तसेच शासन आपल्या दारीचं उद्देश मिशन मोडमध्ये काम करायचे. शासकीय योजना असतात पण लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी शासन आपल्या दारी आलंय. तू लाभार्थी आहे, ही तुझ्या फायद्याची योजना आहे हे सांगण्यासाठी शासन आपल्या दारी येतंय. एकट्या नगर जिल्ह्यात २४ लाख लाभार्थ्यांपर्यंत आपण यानिमित्ताने पोहचलो. ३९०० कोटी रुपयांचा लाभ अहमदनगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना शासन आपल्या दारीच्या माध्यमातून मिळतोय असंही फडणवीस यांनी म्हटलं.
दरम्यान, ज्यांना बोलायचे त्यांना बोलू द्या, आपण काम करत राहू, सर्वसामान्य जनतेचे परिवर्तन घडवत राहू. आम्ही पारदर्शी प्रामाणिकपणे काम करतोय. स्वत:च्या कुटुंबाचा विचार न करता तुमच्या पाठिशी ताकदीने उभे राहू असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.