"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 11:15 AM2024-09-20T11:15:28+5:302024-09-20T11:16:37+5:30
राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांना पर्याय म्हणून परिवर्तन महाशक्ती आघाडीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र सत्ताधाऱ्यांसाठी ही आघाडी काम करते असा आरोप राऊतांनी केला आहे.
मुंबई - तिसरी आघाडी जी असते, ही कायम सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी बनवली जाते. जे सत्तेत असतात, त्यांना काही अडचणीचे विषय असतात मग ते तिसरी आघाडी निर्माण करून विरोधकांच्या मतांमध्ये दुफळी निर्माण करण्याचं काम करतात. हा आतापर्यंतचा इतिहास आणि अनुभव तेच सांगतो अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी परिवर्तन महाशक्ती नावाच्या तिसऱ्या आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत आहे. परंतु महाविकास आघाडीची मते थोडीफार कमी करता आली तर त्यासाठी नवीन आघाड्या स्थापन करायच्या. त्यासाठी पैशांचा वापर करायचा, पदाचा वापर करायचा असं धोरण मला याक्षणी दिसतेय. सत्ताधाऱ्यांकडून अप्रत्यक्षपणे तिसरी आघाडी बनवली जाते. आमच्यासारखे मजबूत महाविकास आघाडीची मते खाण्यासाठी तिसरी आघाडी, चौथी आघाडी ते बनवतात असा आरोप त्यांनी केला.
तसेच तिसऱ्या आघाडीत जे कुणी समाविष्ट आहेत ते व्होट कटिंग मशिन आहेत. या राज्याच्या दृष्टीने भाजपानं घेतलेल्या भूमिकेमुळे महाराष्ट्र डळमळीत झाला आहे. कमकुवत झालेला आहे. मोदी येतात फिती कापून जातात. पण उद्योगाचे काय, आजही एक उद्योग गुजरातला जातायेत. महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जातोय तो थांबवता येतील का यासाठी मोदींनी प्रयत्न करावेत असा निशाणाही खासदार संजय राऊतांनी भाजपावर साधला.
दरम्यान, महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत आज बैठक आहे. मुंबईतील प्रत्येक जागेवर आमची चर्चा होतेय. ज्या पक्षाचा उमेदवार विजयी होईल त्याला जागा सोडली जाईल. कुठलेही मतभेद नाहीत. जर एखाद दुसऱ्या जागेवर मतभेद झाले तर आम्ही पुन्हा एकत्र बसू. तिन्ही पक्षाचे हायकमांड बसतील. त्यामुळे चर्चेतून मार्ग निघेल. तिन्ही पक्ष लोकसभेला ज्याप्रकारे मजबुतीने लढले तसेच विधानसभा निवडणुकीत मजबुतीनं लढू. लोकसभेला जागावाटप अधिक सोपे होते कारण ४८ जागांचीच चर्चा होती. विधानसभेला २८८ जागांचा विषय आहे. ३ प्रमुख पक्ष आणि इतर लहान पक्ष आहेत. त्यांनाही सामावून घेण्याची आमची भूमिका आहे. मित्रपक्षांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतायेत त्यात आम्ही यशस्वी होईल असं राऊतांनी म्हटलं.