"... हा तर भाजपाचा गोरखधंदा", संजय राऊतांचा इलेक्टोरल बॉण्ड्सवरून हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 12:33 PM2024-02-17T12:33:20+5:302024-02-17T12:36:24+5:30
Sanjay Raut : सर्वोच्च न्यायालयाच्या इलेक्टोरल बॉण्ड्स निकालावर संजय राऊत म्हणाले की, गौतम अदानी आणि भाजपा वेगळे नाहीत.
Sanjay Raut : (Marathi News) मुंबई : इलेक्टोरल बॉण्ड्स हे निवडणूक निधी म्हणून घ्यायचे हा भाजपाचा गोरखधंदा आहे, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केला आहे. तसेच, भाजपामुळे राज्याची संस्कृती आणि संस्कार पूर्ण बिघडले आहेत. महाराष्ट्राची संस्कृती लयाला जाताना दिसत असून त्याला जबाबदार पूर्णपणे देवेंद्र फडणवीस, अमित शाह, नरेंद्र मोदी आणि त्यांचा सध्याचा भाजपा आहे, अशीही टीका संजय राऊत यांनी चिपळूण येथे झालेल्या राड्यावरून केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या इलेक्टोरल बॉण्ड्स निकालावर संजय राऊत म्हणाले की, गौतम अदानी आणि भाजपा वेगळे नाहीत. इलेक्टोरल बॉण्ड्सवर सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे आणि ज्यांनी इलेक्टोरल बॉण्ड्स घेऊन भाजपाची तिजोरी भरली आहे. त्यांची नावे जाहीर करा, ही सूचना किंवा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यात गौतम अदानींचे नाव सर्वात प्रथम आहे, मला खात्री आहे. अशा प्रकारचे आपल्या उद्योगपतींना ठेके द्यायचे आणि त्या बदल्या शेकडो कोटीचे इलेक्टोरल बॉण्ड्स निवडणूक निधी म्हणून घ्यायचे हा भाजपाचा गोरखधंदा आहे. त्यामुळे हजारो कोटी रुपये भाजपाच्या तिजोरीत आज जमा झाले आहेत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
उद्योगपती गौतम अदानी यांना वांद्रेतील एमएसआरडीची जागा मिळणार आहे? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, मिठागराची जमीन अडाणींना, धारावी अडाणींना अख्खी मुंबई अडाणींना दिली आहे. मुंबईचे उद्या नाव बदलून अडाणीनगर केले तर १०६ हुतात्मे ज्यांनी मुंबईसाठी हौतात्म्य दिले आहे. त्यांना स्वर्गात पुन्हा एकदा आत्महत्या करावी लागेल. काय करतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? हिंदुत्वरक्षक काय करताय? कोल्हापुरात बसून, अख्खी मुंबई एका उद्योगपतीच्या घशात चालली आहे आणि त्या मुंबईवरचा मराठी ठसा पुसला जातोय. हे सगळे चोर दिल्लीवाल्यांची पुसत बसले आहे. न्यायालयाने जो काल निकाल दिलेला आहे. तो भाजपाचा मुखवटा फाडणारा आहे. त्यात जे नावे जाहीर होतील ते बघाच, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
"महाराष्ट्राची संस्कृती लयाला जाताना दिसतेय"
काल चिपळूण येथे भाजपा आणि ठाकरे गटामध्ये झालेल्या राड्यावरून संजय राऊत म्हणाले की, भाजपामुळे राज्याची संस्कृती आणि संस्कार पूर्ण बिघडले आहेत. चिखलफेक करण्यासाठी भाजपाने काही टोळ्या भाड्याने घेतल्या आहेत. पुरोगामी महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती होती. यशवंतराव चव्हाणांपासून ते आतापर्यंत त्या संस्कृतीवर नशेच्या, दारूच्या, अनैतिकतेच्या गुळण्या टाकण्याचे काम भाजपाने काही भाडोत्री लोकांकडून सुरु केले आहे. आम्ही सुद्धा कठोर शब्दांचा वापर करतो. आमच्याकडून एखादा-दुसरा शब्द चुकीचाही जात असेल. मात्र ज्या पद्धतीने भाजपाने जो दारूखाना सुरु केला आहे. त्यावरून मला महाराष्ट्राची संस्कृती लयाला जाताना दिसत आहे. त्याला देवेंद्र फडणवीस, अमित शाह, नरेंद्र मोदी आणि त्यांचा भाजपाच पूर्णपणे जबाबदार आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.