ही मर्दानगी नाही... माझी पत्नी, बहीण गाडीत नसते तर...; वाहनावरील हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची थेट प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 09:54 AM2022-09-26T09:54:00+5:302022-09-26T09:55:32+5:30
हा हल्ला नाहीच, हा भ्याड हल्ला. हे चोरीचं प्रकरण, घरात शिरायचं, पाकीट मारायचं आणि निघून जायचं. हल्ला कशाला म्हणतात...
शिवसेनेत बंडखोरी करत शिंदे गटात सर्वात शेवटी सामील झालेले आमदार संतोष बांगर यांना रविवारी अंजनगाव सुर्जी येथे शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी काही शिवसैनिकांनी त्यांच्या वाहनाच्या काचांवर चपला आणि थापा मारल्याची घटना घडली. एवढेच नाही, तर यावेळी ‘50 खोके, एकदम ओके’ अशी नारेबाजीही करण्यात आली. सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास ते येथील मठातून दर्शन करून निघाले असता हा संपूर्ण प्रकार घडला. यावेळी त्याच्यासोबत त्यांची पत्नी आणि बहीणही उपस्थित होते. यानंतर आता आमदार संतोष बांगर यांनी या संपूर्ण घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
बांगर म्हणाले "मी, माझी पत्नी आणि बहीण देव दर्शनासाठी गेलो होतो. देव दर्शनानंतर मंदिरातून बाहेर पडलो असता, काही दहा-पाच लोकांनी नारेबाजी केली. माझ्या गाडीवर हात मारण्याचा प्रयत्न केला. याला हल्ला म्हणता येणार नाही. हल्ला कशाला म्हणतात, समोर येऊन कुणी वार करत असेल तर त्याला हल्ला म्हणतात. याला चोरपणा म्हणतात. पूर्वीच्या काळी म्हणत होते, डाका टाकायचा. डाका कशाला म्हणतात, तर घरा पुढे जाऊन फटाका लावायचा आणि सांगायचं, की मी तुमच्या घरावर डाका टाकतोय. तो पूर्वीचा काळ होता. हे चोर प्रकरण आहे."
एवढेच नाही, तर "ही मर्दानगी नाही. माझी बहीण आणि पत्नी गाडीत नसते तर संतोष बांगर काय आहे? हे त्यांना सांगितलं असतं. एक घाव दोन तुकडे केले नसते. तर सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून घेण्याच्या लायकीचा मी नसतो. काही दिवसांपूर्वी, माझ्या गाडीला टच करून दाखवा, अशा आशयाचे वक्तव्य संतोष बांगर यांनी केले होते. यासंदर्भात विचारले असता, मी आजही सांगतो, माझ्या गाडीच्या काचाला टच करून दाखवा, हा संतोष बांगर, जे बोललो होतो ते करून दाखवल्याशिवाय राहणार नाही,"असेही बांगर म्हणाले. ते ‘टीव्ही 9 मराठी’ सोबत बोलत होते.
हल्ला कशाला म्हणायचं? -
हा हल्ला नाहीच, हा भ्याड हल्ला. हे चोरीचं प्रकरण, घरात शिरायचं, पाकीट मारायचं आणि निघून जायचं. हल्ला कशाला म्हणतात. छातीवर वार करणं याला हल्ला म्हणतात. त्यांना तेथेच दाखवलं असतं. माझी पत्नी आणि बहीण नसती ना, मग त्यांना दाखवलं असतं संतोष बांगर काय आहे, असेही बांगर म्हणाले.