'हे शरद पवारांचे दुकान नाहीय'; गुणरत्न सदावर्तेंच्या वेगळा विदर्भाच्या सभेत राडा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 06:32 PM2023-09-28T18:32:11+5:302023-09-28T18:32:42+5:30
या सभेला एसटी कर्मचारी जमले होते. एसटीच्या संदर्भातल्या विषयांवर बोलण्यास एक गट सांगत होता.
यवतमाळ शहरातील टिंबर भवन येथे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची विदर्भाचा बुलंद आवाज सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेवेळी दोन गटांत जोरदार राडा झाला आहे. वेगळा विदर्भ झालाच पाहिजे या मुद्द्यावरून जमलेल्या सभेत एका गटाने एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ कधी होणार ते सांगा आदी मागण्या केल्या. यावरून सदावर्ते भडकले आणि त्यांनी अर्वाच्च भाषेत या लोकांना धक्के मारून बाहेर काढण्यास सांगितले.
या सभेला एसटी कर्मचारी जमले होते. एसटीच्या संदर्भातल्या विषयांवर बोलण्यास एक गट सांगत होता. तेव्हा आपले आपले विषय मांडण्यापूर्वी माहिती द्यायची, त्याला वेळ दिली जाते. हे शरद पवारांचे दुकान नाहीय असे गुणरत्न म्हणाले.
संदीप शिंदे सारख्या बांधलेल्या आणि पाळलेल्या कुत्र्याचे नाहीय. धक्के मारून बाहेर काढा त्याला. त्याला शिस्त काय असते ते समजायला हवे. संदीप शिंदेंच्या कुत्र्याला ढकलून बाहेर काढा, असे सदावर्तेंनी व्यासपीठावरून सांगितले.
गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार आरोप करीत त्यांना धक्के मारून बाहेर काढा, असे म्हटल्याने प्रकरण आणखी चिघळले. सध्या एका गटाला सभेतून बाहेर काढण्यात आले आहे.
पुस्तकावर स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र आहे. शरद पवार यांना धडा शिकवला. तसाच धडा विरोधक संदीप शिंदे यांना शिकवला जाईल. हिंदू राष्ट्रात श्रीरामाच्या विचारात बदल होऊ देणार नाही, असा इशारा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी विरोधकांना दिला. जनसंघ केवळ दोनच संघ मानते. एक तथागत गौतम बुद्धांचा संघ आणि दुसरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, दोन्ही संघ वैचारिक प्रगल्भ असल्याचे ऍड. सदावर्ते म्हणाले.