"हा निचपणाचा कळस", रोहित पवारांचा राज्य सरकारवर संताप; तातडीने अधिवेशन बोलवण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 03:07 PM2024-08-27T15:07:37+5:302024-08-27T15:09:19+5:30

राज्याच्या आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी तातडीने दोन दिवसीय अधिवेशन बोलवावे, अशी मागणीही आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

"This is the height of meanness", Rohit Pawar's rant against the state government; Demand to convene the session immediately | "हा निचपणाचा कळस", रोहित पवारांचा राज्य सरकारवर संताप; तातडीने अधिवेशन बोलवण्याची मागणी

"हा निचपणाचा कळस", रोहित पवारांचा राज्य सरकारवर संताप; तातडीने अधिवेशन बोलवण्याची मागणी

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे आठ महिन्यापूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना काल घडली. या घटनेनंतर सरकारवर चहूबाजूंनी टीका होत असून विविध संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. यावरून राजकीय वातावरण तापले असून विरोधी पक्षाकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच, राज्यावर कर्जाचा बोजाही वाढत चालला आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी तातडीने दोन दिवसीय अधिवेशन बोलवावे, अशी मागणीही आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

रोहित पवार ट्विटद्वारे म्हणाले की, टेंडरबाज, दलालीखोर सरकारचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामातही दलाली खाण्याचे कृत्य म्हणजे नीचपणाचा कळस आहे. प्रत्येक कामाच्या अंदाजपत्रकात १० टक्के वाढ आणि नंतर वाढीव दराने टेंडर भरून २५ टक्के वाढ करायची नंतर कंत्राटदाराकडून दलाली खायची, असा नवा गोरखधंदा या सरकारने सुरू केला असून ५० हजार कोटी रुपयांच्या दलालीची प्रकरणे मी स्वतः बाहेर काढली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एकीकडे कामांची बिले निघत नाहीत म्हणून विकासकामे थांबली आहेत, तर दुसरीकडे तिजोरी रिकामी असल्याने अनेक योजनांना तसेच भरती प्रक्रियांनाही स्थगिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र दलालीच्या दलदलीत अडकला असून राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या मार्गावर येऊन ठेपला आहे. या दलालीच्या दलदलीला घाबरून गुंतवणूकदारांनीही राज्याकडे पाठ फिरवली असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

महाराष्ट्राची अधोगतीकडे होत असलेली वाटचाल रोखणे गरजेचे असून त्यासाठी राज्याच्या आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी महायुती सरकारने त्वरित दोन दिवसीय अधिवेशन बोलवून चर्चा करायला हवी, अन्यथा दिवाळखोरीच्या गर्तेत अडकत चाललेला महाराष्ट्र बाहेर काढणे खूप कठीण होऊन बसेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
 

Web Title: "This is the height of meanness", Rohit Pawar's rant against the state government; Demand to convene the session immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.