काँग्रेसच्या ऐतिहासिक चुकांचं पापक्षालन करण्याची ही वेळ; मविआतील मित्रपक्षाचं पवारांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 08:11 PM2024-04-13T20:11:53+5:302024-04-13T20:14:34+5:30

Akola Lok Sabha: काँग्रेसने अकोला मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

This is the time to atone for the historical mistakes of Congress A letter from an ally in Mva to sharad Pawar | काँग्रेसच्या ऐतिहासिक चुकांचं पापक्षालन करण्याची ही वेळ; मविआतील मित्रपक्षाचं पवारांना पत्र

काँग्रेसच्या ऐतिहासिक चुकांचं पापक्षालन करण्याची ही वेळ; मविआतील मित्रपक्षाचं पवारांना पत्र

Mahavikas Aghadi ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. मात्र चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतरही जागावाटपावर तोडगा काढण्यास दोन्ही बाजूच्या नेत्यांना अपयश आलं आणि अखेर प्रकाश आंबेडकरांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली. परंतु स्वबळावर लढत असतानाही आंबेडकर यांनी आपण राज्यातील सात लोकसभा मतदारसंघांत काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं. त्यानुसार त्यांनी काही मतदारसंघांत काँग्रेस उमेदवारांना पाठिंबाही जाहीर केला. तसंच बारामतीत वंचित आघाडीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनाही पाठिंबा दिला. मात्र दुसरीकडे, काँग्रेसने अकोला मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा घटकपक्ष असणाऱ्या समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी शरद पवार यांना पत्र लिहीत आंबेडकरांना पाठिंबा देण्यासाठी साद घातली आहे.

कपिल पाटील यांनी शरद पवारांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेसवर तिखट शब्दांत हल्लाबोल करण्यात आला आहे. "उद्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा जाहीर करावा, ही आग्रहाची विनंती. आदरणीय उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे नेते आहेत आणि आपण पालक आहात, त्यामुळे आपण दोघांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न न देणं, संसद भवनात फोटोही न लावणं, मंडल आयोग दडपून ठेवणं अशा काँग्रेसच्या ऐतिहासिक चुकांचं पापक्षालन करण्याची याशिवाय दुसरी वेळ नाही," असं कपिल पाटील यांना शरद पवारांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, कपिल पाटील यांनी आपल्या पत्रातून अकोल्यातून काँग्रेस उमेदवार अभय पाटील यांच्या राजकीय आणि वैचारिक पार्श्वभूमीचा दाखला देत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

कपिल पाटील यांनी शरद पवार यांना लिहिलेलं पत्र जसंच्या तसं....

"आदरणीय श्री. शरद पवार साहेब

सप्रेम नमस्कार,
महाराष्ट्र हा फुले - शाहू - आंबेडकर विचारधारेवर उभा आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळीत सर्वाधिक योगदान महाराष्ट्रानेच दिलं. छत्रपती शिवरायांचा वारसा असलेला महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे कधी झुकला नाही. 

नथुरामी फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात तुम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडी उभी केली. म्हणूनच समाजवादी गणराज्य पार्टी आणि राज्यातील सर्व डाव्या पुरोगामी शक्ती तुमच्या सोबत आहेत.

तथापी या आघाडीत नथुरामी फॅसिझमच्या विरोधात सातत्याने सर्वात प्रखर भूमिका घेणारे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी यांना सामावून घेण्यात आपल्या सर्वांना अपयश आले. त्याची सल आपल्याही मनात असेल. 

प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांना महाविकास आघाडीत सामावून घेता आले नाही म्हणून त्यांना भाजपची बी टीम म्हणून हिणवले जात आहे, अपमानित केले जात आहे. हे कमी की काय म्हणून आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या विरोधी प्रचारात उतरवण्यात आले आहे. हे खरोखरच दुर्मानवी आहे. दुर्दैवी नव्हे दुर्मानवी यासाठी की बाबासाहेबांचा दैवावर विश्वास नव्हता. आणि सश्रद्ध माणसं मानवी चुकांसाठी दैवाला दोष देत नाहीत. ऐतिहासिक जखमांचं ज्यांना भान आहे, त्यांनी त्यावरची खपली का काढावी हे  समजत नाही. 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू शाहू छत्रपती महाराज यांना कोल्हापूर लोकसभेत उमेदवारी देण्यासाठी आपण पुढाकार घेतला. ही आशा आणि विश्वास निर्माण करणारी घटना आहे. फुले - शाहू - आंबेडकरांचा महाराष्ट्र फॅसिस्ट जातीयवादी शक्तींना साथ देत नाही. हे आपण दाखवून दिलं आहे. त्याच भूमिकेतून खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी शाहू छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बारामतीत सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात सुद्धा उमेदवार त्यांनी दिलेला नाही. मात्र डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे खरे वारस प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात कॉँग्रेसचा उमेदवार देऊन आपण मोठी चूक करत आहोत. 

अकोल्यात काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांचे वडील संघ - भाजपचे होते म्हणून आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण डॉ. अभय पाटील हे सुद्धा त्याच विचारांचे समर्थक आहेत. बाबरी मशीद पाडण्याचं आणि मुस्लिम विरोधी नफरतीचं ते आजही समर्थन करतात, तरीही ते आघाडीचे उमेदवार आहेत, हे धक्कादायक आहे. 

उद्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा जाहीर करावा, ही आग्रहाची विनंती.

आदरणीय उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे नेते आहेत आणि आपण पालक आहात, त्यामुळे आपण दोघांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न न देणं, संसद भवनात फोटोही न लावणं, मंडल आयोग दडपून ठेवणं अशा काँग्रेसच्या ऐतिहासिक चुकांचं पापक्षालन करण्याची याशिवाय दुसरी वेळ नाही. धन्यवाद!"
 

Web Title: This is the time to atone for the historical mistakes of Congress A letter from an ally in Mva to sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.