हेच पवारांच्या पोटात दुखतंय, संतप्त चंद्रकांत पाटलांचं रोहित पवारांना चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 03:49 PM2022-12-11T15:49:16+5:302022-12-11T15:50:09+5:30
पुण्याचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील चिंचवडमधील मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी आले होते. तेथे हा प्रकार घडला.
मुंबई - मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसापूर्वी केलेल्या फुले-आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. शनिवारी पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर एकाने अचानक शाईफेक केली. अचानक घडलेल्या या घटनेनं आणि घोषणाबाजीमुळे गोंधळ निर्माण झाला. या प्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर, आता चंद्रकांत पाटील यांनी शाईफेकीच्या घटनेवरुन थेट पवार कुटुंबीयांवर हल्लाबोल केला आहे. माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावर गेल्याचं सरंजामशहांना पहावत नाही, असे पाटील यांनी म्हटलं.
पुण्याचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील चिंचवडमधील मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी आले होते. तेथे हा प्रकार घडला. यावर, मी कार्यक्रमाला चाललो आहे. मी सर्व कार्यक्रम करणार आहे. मी कुणाला घाबरत नाही. असा भ्याडपणे हल्ला करणे चुकीचे आहे. हिंमत असेल तर समोरुन या. सर्व पोलिस डिपार्टमेंट बाजूला करतो, असे आव्हानच चंद्रकांत पाटील यांनी दिले. तसेच, टिकाकारांना प्रत्युत्तर देताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मी वाचलंय, मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेबांचे नाव देण्यासाठीचा संघर्ष मी केलाय, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेबांवर माझ्यासोबत डिबेट करायला या, असे चॅलेंज आमदार रोहित पवार आणि नाना पटोलेंना दिले.
माझ्यासारखा गिरणीकामगाराचा मुलगा एवढा मोठा झालाय, हेच पवारांच्या पोटात दुखतंय. सरंजामशाहीवाल्यांना हेच पाहवत नाही, रोहित पवारांसारखा राजकीय घरातून मोठा झालो नाही, मी चळवळीतून मोठा झालेलोय, असे म्हणत बाबासाहेब आधी वाचून माझ्याकडे या, असे चॅलेंजच रोहित पवारांना चंद्रकांत पाटील यांनी दिले.
शाईफेकीचं बारामीत कनेक्शन?
भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकेल त्याला 51 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करणारे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड आणि इतर चौदा जणांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे बारामती कनेक्शन असल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. भाजप तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी फिर्याद दिली आहे .त्यानुसार शनिवारी रात्री उशिरा तालुका पोलीस ठाण्यात ऋषी गायकवाड यांच्यासह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय म्हणाले रोहित पवार
“चंद्रकांतदादांचं वक्तव्य हे योग्य नव्हतं, त्याचा निषेधच. पण म्हणून त्यांच्यावर केलेली शाईफेक योग्य नाही. थोर व्यक्तींच्या आपण आत्मसात केलेल्या विचाराच्या विरोधात एक विचार अनेक वर्षांपासून काम करत आहे, त्याचा विरोध हा आपण सर्वांनी वैचारिक आणि संवैधानिक मार्गानेच करणं गरजेचं आहे,” असे रोहित पवार म्हणाले. त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं आहे.
कोणी फेकली शाई?
डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक करण्यात आली. शाई फेक करणाऱ्या तरुणाची ओळख पटली आहे. शाई फेकणाऱ्याचे मनोज गरबडे असे नाव आहे. तो आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून पिंपरी-चिंचवड परिसरात परिचित आहे.