पोलीस भरतीत पहिल्यांदा होणार मैदानी चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 01:41 PM2022-06-28T13:41:36+5:302022-06-28T13:43:09+5:30
मैदानी चाचणी पहिल्यांदा घेण्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना भरतीसाठी अधिक संधी मिळणार आहे.
जमीर काझी -
अलिबाग : पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या भरतीमध्ये आता पहिल्यांदा मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द करण्यात आला असून नवीन नियमावली लागू करण्याबाबत राजपत्र जारी करण्यात आले आहे. येत्या दोन महिन्यांत राज्यातील विविध पोलीस घटकांत ७ हजार कॉन्स्टेबलची पदे भरण्यात येणार आहेत.
मैदानी चाचणी पहिल्यांदा घेण्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना भरतीसाठी अधिक संधी मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलीस भरतीमध्ये पहिल्यांदा लेखी परीक्षा व त्यानंतर पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी घेऊन अंतिम गुणवत्तायादी निवड यादी जाहीर करण्याचे निर्णय घेण्यात आला होता. भरतीसाठी होणारी गर्दी व गोंधळ टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, बदललेल्या नियमांमुळे ग्रामीण भागातील युवकांना तुलनेत कमी संधी निर्माण झाली होती. त्यामुळे २०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात पोलीस भरतीत ही पद्धत रद्द करून पूर्ववत मैदानी चाचणी प्रथम व त्यानंतर लेखी परीक्षा घेण्याचे नमूद केले होते.
२०१९ मध्ये जाहीर केलेल्या रिक्त ५,२९७ पदासाठीची भरतीमध्ये पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली होती जाहिरातीमध्ये तसे नमूद केल्याने ते बदलले नव्हते. मात्र, यावर्षीच्या भरतीसाठी सेवा प्रवेश प्रकियेत सरकारने दुरुस्ती केली आहे. उमेदवाराची पहिल्यांदा मैदानी चाचणी घेतली जाणार आहे.
अशी होणार मैदानी चाचणी -
शैक्षणिक व शारीरिक अर्हता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची ५० गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येईल. त्यामध्ये पुरुषांसाठी १६ मीटर धावणेसाठी २० गुण व १०० मीटर धावणे आणि गोळाफेकसाठी प्रत्येकी पंधरा गुण दिले जातील, तर महिला उमेदवारासाठी १६०० ऐवजी ८०० मीटर धावण्याची चाचणी असेल.
ग्रामीण भागातील तरुणांची मागणी लक्षात घेऊन पोलीस भरतीच्या सेवा प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार असल्याने त्यांचा उमेदवारांना अधिक लाभ होईल.
- सतेज पाटील, गृह राज्यमंत्री