थोर विचारवंत, पत्रकार गमावला : राज्यपाल
By Admin | Published: January 20, 2016 02:31 AM2016-01-20T02:31:01+5:302016-01-20T02:31:01+5:30
डॉ. अरुण टिकेकर हे व्यासंगी अभ्यासक, इतिहासकार आणि उत्कृष्ट पत्रकार होते. इतिहासाचे ते गाढे अभ्यासक होते व त्यांच्या लिखाणातून त्यांच्या व्यासंगाची तसेच बहुश्रुतपणाची प्रचिती येत असे
मुंबई : डॉ. अरुण टिकेकर हे व्यासंगी अभ्यासक, इतिहासकार आणि उत्कृष्ट पत्रकार होते. इतिहासाचे ते गाढे अभ्यासक होते व त्यांच्या लिखाणातून त्यांच्या व्यासंगाची तसेच बहुश्रुतपणाची प्रचिती येत असे. टिकेकर यांच्या निधनाने राज्याने थोर विचारवंत व ज्येष्ठ पत्रकार गमावला आहे. अशा शब्दांमध्ये राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी डॉ. टिकेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अरुण टिकेकर यांच्या निधनामुळे अनेक नामवंतांनी दु:ख व्यक्त केले आहे.
डॉ. टिकेकर यांच्या निधनाने व्यासंगी पत्रकार आणि माहिती व संशोधनपूर्ण लिखाण करणारा अभ्यासक गमाविला, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. डॉ. टिकेकर यांच्या निधनाने मुंबई विद्यापीठाने एक सुहृद सल्लागार आणि स्नेही गमावला आहे, याचे मला आणि विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, संशोधक यांना तीव्र दु:ख होत आहे, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
कायम जाणीव राहील
अरुण टिकेकर यांच्या रूपाने महाराष्ट्राला एक सव्यसाची आणि विचारवंत संपादक मिळाले होते. ‘फास्ट फॉरवर्ड’ या माझ्या संग्रहाच्या निमित्ताने त्यांच्या बरोबर विविध चर्चा व्हायची. महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेत त्यांनी परिश्रमपूर्वक स्थान मिळवले होते. त्यांनी केलेल्या कार्याची जाणीव पुढील पिढ्यांनासुद्धा राहील.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी
अभ्यासू वृत्तीचा विचारवंत
एक गंभीर व अभ्यासू विचारवंत, सव्यसाची लेखक, १९व्या शतकाचे गाढे अभ्यासक, निर्भीड पण संयमी संपादक व सारे आयुष्य आपली विद्यार्थीदशा जोपासलेले विद्यार्थी ही अरु ण टिकेकरांची महाराष्ट्रास असलेली ओळख आहे. ‘लोकसत्ता’, ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘लोकमत’ या तीनही मोठ्या मराठी दैनिकांचे संपादक राहिल्याचा मान त्यांच्या गाठीशी आहे. ग्रंथकार, ग्रंथालयाचे संचालक आणि अतिशय निर्मळ व स्वच्छ मनाचा माणूस अशीही त्यांची ओळख साऱ्यांना आहे. त्यांचा व ‘लोकमत’चा संबंध त्या दोहोंचीही ऊर्जा, प्रतिष्ठा व लोकप्रियता उंचावणारा ठरला. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र एका जाणत्या विचारवंताला मुकला आहे. - खा. विजय दर्डा
पत्रकारितेचे मोठे नुकसान
पत्रकारितेच्या बदलत्या स्थित्यंतराचे साक्षीदार असलेले ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या जाण्याने मुंबई व महाराष्ट्राच्या इतिहासाचा जाणकार हरपला आहे.
- अरुण साधू, ज्येष्ठ पत्रकार
व्यासंगी पत्रकार : ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर यांनी वेळोवेळी होत असलेल्या सामाजिक बदलांना आपल्या लेखणीतून अधोरेखित केले. पत्रकारितेची मूल्ये जपणारे आणि लेखणीच्या माध्यमातून वेगवेगळे प्रश्न मांडणारे व्यासंगी पत्रकार हरपले आहेत. - विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री
निर्भीड, नि:ष्पक्ष पत्रकार : अरुण टिकेकर यांच्या निधनामुळे एक निर्भीड व नि:पक्ष पत्रकार, तसेच लोकांशी थेट जुळलेले एक अभ्यासू विचारवंत हरपले आहेत. टिकेकर यांच्या निधनामुळे वैचारिक चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.
- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते विधानसभा
असामान्य प्रतिभेचा विचारवंत
मराठी पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील असामान्य प्रतिभा लाभलेले विचारवंत लेखक आपल्यातून निघून गेले आहेत. मराठी व इंग्रजी साहित्य यावर टिकेकरांचे विशेष प्रभुत्व होते. महाराष्ट्र व मुंबईच्या इतिहासाविषयी त्यांचा गाढा अभ्यास होता. आज टिकेकर या जगात नाहीत, परंतु लढवय्या पत्रकार, संपादक म्हणून
ते अजरामर राहतील.
- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री