सायन कोळीवाड्यात कांटे की टक्कर
By Admin | Published: January 20, 2017 02:18 AM2017-01-20T02:18:40+5:302017-01-20T02:18:40+5:30
फेररचनेमुळे ८० टक्के प्रभागांचे तुकडे होऊन नवीन प्रभागाने आकार घेतला आहे.
मुंबई : फेररचनेमुळे ८० टक्के प्रभागांचे तुकडे होऊन नवीन प्रभागाने आकार घेतला आहे. यामुळे मतदारही विखुरले गेल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे प्रस्थापितांना अस्तित्वासाठी, तर गेल्या निवडणुकीत बाहेर फेकले गेलेल्यांना ती पत परत मिळवण्यासाठी लढा द्यावा लागणार आहे. भाजपाचा गड मानला जाणाऱ्या सायन-कोळीवाडा विधानसभा क्षेत्रातही विजयी दौड सुरूच राहण्यासाठी भाजपाने त्यांची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर काँग्रेसने सर्व शक्ती पणाला लावून कडवे आव्हान उभे करण्याची रणनीती आखली आहे.
प्रभाग क्रमांक १६५ व १६७मधील काही भाग वेगळे करून प्रभाग क्रमांक १७२ तयार झाला आहे. चुन्नाभट्टी ते माटुंगा रेल्वे स्थानक अशा या प्रभागात जुन्या इमारतींचा पुनर्विकास व वाहतुकीची कोंडी हे प्रमुख मुद्दे आहेत. फेररचनेत नव्याने आकाराला आलेला हा प्रभाग आरक्षणात सर्वसामान्य वर्गासाठी खुला झाला आहे. त्यामुळे सर्वच इच्छुकांची उडी या प्रभागावर पडू लागली आहे. मात्र, गुजराती जनसंख्या अधिक असल्याने भाजपा आणि भाजपापूर्वी अनेक वर्षे या ठिकाणी काँग्रेस असल्याने दोन्ही पक्ष तगड्या उमेदवाराच्या शोधात आहेत.प्रभाग क्रमांक १६५चा काही भाग तर १६७ प्रभागाचा सर्वाधिक भाग प्रभाग क्रमांक १७२मध्ये आहे. १६५मध्ये शिवसेनेच्या प्रणिती वाघधरे, तर १६७मध्ये भाजपाच्या राजश्री शिरवाडकर विद्यमान नगरसेवक आहेत. (प्रतिनिधी)
>काँग्रेसला संधी
काँग्रेसचे उपेंद्र दोशी तीन टर्म, तर त्यांच्या पत्नी रेखा दोशी एक टर्म या प्रभागातून निवडून आल्या आहेत. गेल्या निवडणुकीत हा प्रभाग मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षित झाल्याने दोशी कुटुंब बाद झाले; परंतु यावेळी हा प्रभाग खुला झाल्याने दोशी प्रयत्नशील आहेत. तर काँग्रेसमध्ये दावेदार वाढल्याने रस्सीखेचही सुरू आहे.
>भाजपात दावेदार वाढले
विधानसभा निवडणुकीत भाजपाचे तमील सेलवन निवडून आले. त्यांनी काँग्रेसचे जगन्नाथ शेट्टी आणि शिवसेनेचे मंगेश साटमकर यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादीचे प्रसाद लाड भाजपात आले आहेत. तर विद्यमान नगरसेविका राजश्री यांचे पती राजेश शिरवाडकर या ठिकाणी इच्छुक असल्याचे समजते. शिवसेनेतून शाखाप्रमुख अशोक वाघमारे यांचे नाव चर्चेत आहे.
>गुजराती मतदारांचा कौल निर्णायक
या प्रभागात ३८ हजार मतदार असून, गुजराती जनसंख्या अधिक आहे. त्यामुळे सर्वच पक्ष या ठिकाणी गुजराती उमेदवार उभा करण्याची शक्यता आहे. मात्र, येथील गुजराती मतदार कोणाला कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.