थोरल़्या विवाहीत बहिनीला पळवले, धाकटीला धमकी देऊन तीन वेळा बलात्कार
By admin | Published: August 21, 2016 02:14 PM2016-08-21T14:14:09+5:302016-08-21T14:30:10+5:30
थोरल्या विवाहीत बहिनीला धाक दाखवून पळवून नेल्यानंतर तिच्या १५ वर्षाच्या अल्पवयीन बहिनीवर धमकी देऊन तीन वेळा बलात्कार केल्याची फिर्याद देण्यात आली आहे
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २१ : मुढाळे (ता. बारामती) येथे थोरल्या विवाहीत बहिनीला धाक दाखवून पळवून नेल्यानंतर तिच्या १५ वर्षाच्या अल्पवयीन बहिनीवर धमकी देऊन तीन वेळा बलात्कार केल्याची फिर्याद देण्यात आली आहे. आरोपी काळे फरारी झाला आहे. त्याच्या शोधार्थ पोलिस पथक पाठवण्यात आले आहे. आरोपी आणि फिर्यादी भटक्या समाजातील आहे. आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
याप्रकरणी दिलीप मदन काळे (रा. बडेखान, ता. फलटण, जि. सातारा) याच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीवर मे २०१६ ते १४ आॅगस्ट २०१६ या कालावधीत तीन वेळा अत्याचार करण्यात आला. आरोपीच्या विरोधात बलात्कारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडीत मुलीच्या आईने वडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी महिलेची विवाहीत मुलगी मंगळवारी (दि. १६) दुपारी ३ वाजता घरातून निघून गेली. तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही.
याबाबत मुलीच्या आईने विवाहीत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार वडगाव पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर विवाहीत मुलीला आरोपी दिलीप काळे यानेच पळवून नेल्याची माहिती पिडीत कुटूंबाला मिळाली. या दरम्यान त्यांनी अधिक चौकशी केली असता, त्यांच्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर आरोपी काळे याने मे २०१६ ते १४ आॅगस्ट २०१६ दरम्यान धमकी देऊन तीन वेळा बलात्कार केला. यानंतर पीडित मुलीच्या आईने वडगाव पोलिस ठाण्यात काळे याच्या विरोधात फिर्याद दाखल केली. पिडीत अल्पवयीन मुलगी आठवीमध्ये शिकत आहे.
मे महिन्यात काळे हा मुढाळे येथे पिडीत मुलीच्या घरी आला होता. घरी कोणी नसल्याचे पाहून पिडीत मुलीला विवाहाचे अमिष दाखवत आपण पळून जाऊन लग्न करू, असे अश्वासन दिले. पळून गेलो तर घरचे आपल्याला जिवंत सोडणार नाहीत, असे पिडीत मुलीने काळे याला सांगितले.
त्यावर आरोपीने, तुझ्या भावाला व बहिनीला खोट्या गुन्ह्यात अडकवेन, त्यांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर जुनमध्ये देखील काळे याने पिडीत मुलीवर बलात्कार केला. रविवारी (दि. १४) पिडीत मुलीला शाळेला सुट्टी असल्याने ती घरीच होती. घरातील लोक बाहेर गेले असताना त्याने पुन्हा घरी येऊन अल्पवयीन मुलीवर तिसऱ्यांदा बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. काळे याच्या विरूद्ध बलात्कारासह बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास वडगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक सचिन पाटील करीत आहेत.
आर्थिक व्यवहारातून प्रकार घडल्याचा पोलिसांचा संशय
या संदर्भात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक सचिन पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, थोरली विवाहीत मुलगी बेपत्ता असल्याची फिर्याद यापूर्वी दाखल आहे. आरोपी दिलीप काळे यानेच तीला पळवून नेले आहे. असा संशय तिच्या आईने व्यक्त केला. त्यानंतर धाकट्या अल्पवयीन मुलीवर आरोपी काळे यानेच तीन वेळा जबरदस्तीने बलात्कार केल्याची फिर्याद दिली. आरोपी व फिर्यादी भटक्या समाजातील आहेत. त्यांच्यातील लग्नाच्या परंपरागत पद्धतीच्या अर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडला असावा. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथक रवाना केले आहे. दरम्यान थोरली बेपत्ता विवाहीत मुलगी तिच्या नवऱ्याच्या घरी आढळून आली आहे, असा दावा पाटील यांनी केला.