प्रतिबंधित संघटनेच्या सदस्याची कसून चौकशी
By Admin | Published: February 1, 2016 02:16 AM2016-02-01T02:16:10+5:302016-02-01T02:16:10+5:30
अकोला एटीएस लागली कामाला, देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग
अकोला: अकोल्याच्या दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) ताब्यात असलेल्या प्रतिबंधित संघटनेच्या सदस्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. देशविरोधी कारवायांमध्ये तो सहभागी असल्याचा आरोप आहे. पोलीस या आरोपीच्या मागावर चार वर्षांंंपासून होते. या आरोपीकडून प्रतिबंधित संघटनेची माहिती घेण्यासाठी अकोला एटीएस कामाला लागली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी येथे २0१२ मध्ये अकोला एटीएस व पोलिसांनी छापेमारी करून प्रतिबंधित संघटनेच्या एका सदस्यास अटक केली होती. या ठिकाणाहून इंदूर येथील रहिवासी अम्मान ऊर्फ शराफत मुकीम खान हा फरार झाला होता. तेव्हापासून अकोला एटीएस या आरोपीच्या शोधात होती. अम्मानचा अटक वॉरंट राज्यभरात जारी करण्यात आला होता. दरम्यान, या आरोपीची माहिती इंदूर एटीएसला मिळताच त्यांनी अम्मान ऊर्फ शराफत मुकीम खान याला अटक करून नागपूर एटीएसच्या ताब्यात दिले. अकोला एटीएसने या आरोपीस शुक्रवारी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले. त्याला ५ फेब्रुवारीपर्यंंंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीमध्ये अकोला एटीएस आरोपीची कसून चौकशी करीत आहे; तथापि रविवारी रात्रीपर्यंंंत या आरोपीकडून ठोस माहिती एटीएसला मिळाली नव्हती. हा आरोपी एका प्रतिबंधित संघटनेचा सक्रिय सदस्य असून, त्याने देशविरोधी कारवायांमध्येही सहभाग घेतल्याचा आरोप आहे. यासोबतच घातक शस्त्र बाळगणे व कट रचण्याचा आरोप त्याच्यावर आहेत. या आरोपांची शहानिशा करण्यासोबतच त्याच्याकडून प्रतिबंधित संघटनेच्या हालचाली जाणून घेण्याचाही प्रयत्न अकोला एटीएस करीत आहे.