‘किल्ला विकणे’ प्रकरणी तिघांची कसून चौकशी
By Admin | Published: May 10, 2017 03:14 AM2017-05-10T03:14:54+5:302017-05-10T03:14:54+5:30
‘किल्ला विकणे आहे’ असा मजकूर असलेला फलक लावल्याप्रकरणी तिघा संशयितांची मालवण पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालवण (जि. सिंधुदुर्ग) : ‘किल्ला विकणे आहे’ असा मजकूर असलेला फलक लावल्याप्रकरणी तिघा संशयितांची मालवण पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. हे फलक लावण्याचे कृत्य कोणाच्यातरी सांगण्यावरून केल्याची माहिती तपासात पुढे येत आहे. याप्रकरणी अन्य दोन नावे समोर आल्याने याप्रकरणाचा गुंता वाढण्याची शक्यता आहे.
या प्रकरणी प्रसाद कवटकर (देऊळवाडा, मालवण) , सुमित कवटकर (कुंभारमाठ, मालवण),राजाराम कानसे (भरड, मालवण) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नितीन शिर्सेकर (मुंबई) व सिद्धार्थ सकपाळ यांचाही सहभाग असल्याचे तपासातून पुढे आले आहे. किल्ले प्रेरणोत्सव समिती व वायरी ग्रामपंचायत यांनी पोलिसांची भेट घेत याप्रकरणातील मुख्य सूत्रधारावर कारवाई करण्याची मागणी करीत बुधवारी १0 मे रोजी मालवण बंदची हाक दिली आहे.
मालवण पालिकेच्या हद्दीत अनधिकृत फलक लावल्याप्रकरणी मालवण पालिकेने पोलिसात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार शहर विद्रुपीकरण अन्वये गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच गुन्हे लागू होतील काय? यासाठी मालवण पोलीस वरिष्ठांचे मार्गदर्शन घेत आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तपास सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केराम व डॉ. सागर वाघ यांनी दिली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.