राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या त्या १२ निलंबित आमदारांना मतदान करता येणार, निवडणूक आयोगाने दिला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 08:07 PM2021-09-21T20:07:54+5:302021-09-21T20:08:37+5:30
Maharashtra Rajya Sabha Election: या निवडणुकीमध्ये भाजपाच्या १२ निलंबित आमदारांना मतदार करता येणार का, असा असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे.
मुंबई - काँग्रेसचे युवा नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या ४ ऑक्टोबरला ही निवडणूक होणार आहे. दरम्यान, राज्यसभेच्या या जागेसाठी काँग्रेसने रजनी पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, या निवडणुकीमध्ये भाजपाच्या १२ निलंबित आमदारांना मतदार करता येणार का, असा असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. (Those 12 suspended BJP MLAs will be able to vote for the Rajya Sabha elections, the Election Commission has given a big decision)
निवडणूक आयोगाने भाजपाच्या या १२ निलंबित आमदारांना मतदानाचा हक्क देण्याचा निर्णय घेतला आहे. या १२ निलंबित आमदारांना विधान भवनात प्रवेश करण्यास मनाई असल्याने त्यांच्यासाठी विधान भवनाच्या आवारात स्वतंत्र मतदान केंद्र उभारले जाईल. या आमदारांसाठी स्वतंत्र मतपेटी आणि मतपत्रिका असतील, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी चार या वेळेत या निलंबित आमदारांना मतदान करता येईल. त्यांच्या मतपत्रिका नंतर मुख्य मतदान केंद्रातील मतपत्रिकांमध्ये मिसळल्या जातील. दरम्यान, राज्यसभेच्या या एका जागेसाठी ४ ऑक्टोबर रोजी मतदान झाल्यावर लगेच संध्याकाळी मतमोजणी होणार आहे.
दरम्यान, काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसने माजी खासदार रजनी पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. तर भाजपने संजय उपाध्याय यांना रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू अशी रजनी पाटील यांची ओळख आहे. रजनी पाटील या वसंतदादा पाटील यांच्या मानसकन्या असून मूळच्या सांगली जिल्ह्यातील आहेत. विवाहानंतर त्या मराठवाड्यात स्थायिक झाल्या. माजी क्रीडा राज्यमंत्री अशोक पाटील यांच्या त्या पत्नी. बीडमधून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. दुसरीकडे भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली. ते मुंबई भाजपचे सरचिटणीस आहेत. २०१७ मध्ये ते महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून भाजपने हिंदी भाषक चेहऱ्याला उमेदवारी दिली आहे.