आरोप झालेल्यांनी एक क्षणही पदावर राहू नये; अण्णा हजारेंचा मुंडे-कोकाटेंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 17:02 IST2025-02-22T17:01:36+5:302025-02-22T17:02:11+5:30
अण्णा हजारे यांनी नाव न घेता माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचीच अप्रत्यक्षरीत्या मागणी केली आहे.

आरोप झालेल्यांनी एक क्षणही पदावर राहू नये; अण्णा हजारेंचा मुंडे-कोकाटेंवर निशाणा
Anna Hazare: "आरोप असणाऱ्यांना मंत्रिमंडळात घेण्याआधीच सरकारने विचार करणं गरजेचं आहे. मंत्रिमंडळात घेताना कोणाला घ्यायचे किंवा घेऊ नये, हेही ठरवलं पाहिजे. त्यामुळे आरोप झालेल्यांनी एक क्षणही पदावर राहू नये. तत्काळ राजीनामा देऊन बाहेर पडलं पाहिजे," असा अप्रत्यक्ष टोला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंत्री धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांना लगावला आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सरपंच संतोष देशमुख हत्या, कृषी विभागातील घोटाळ्याचे अनेक आरोप होत आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तसेच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनाही न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, या घडामोडींवर राळेगण सिद्धी येथे पत्रकारांनी अण्णा हजारे यांच्याशी संवाद साधला. यावेळी हजारे यांनी नाव न घेता माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचीच अप्रत्यक्षरीत्या मागणी केली आहे.
आरोप होणाऱ्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी हजारे यांनी केली. यावेळी त्यांनी कोणाचे नाव घेतले नाही. परंतु, त्यांचा रोख आरोप होणाऱ्या मुंडे आणि कोकाटे यांच्याकडे असल्याचे बोलण्यातून दिसून येत आहे. हजारे यांच्या आंदोलनामुळे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळातील कृषिमंत्री शशिकांत सुतार, सिंचनमंत्री महादेव शिवणकर, बबनराव घोलप, शोभा फडणवीस यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याची आठवणही यावेळी हजारे यांनी करून दिली.
दरम्यान, तुम्हीच जर वाट सोडून चाललात, तर जनता कुठे जाणार? देश कुठे जाणार आहे? मंत्रिमंडळात असताना आरोप झाल्यावर एक क्षणही पदावर राहू नये. तत्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी अपेक्षा हजारे यांनी व्यक्त केली.