पुस्तकातल्या ‘त्या’ चुकीचे होणार परीक्षण - शिक्षणमंत्री
By admin | Published: February 4, 2017 01:44 AM2017-02-04T01:44:49+5:302017-02-04T01:44:49+5:30
समाजात मानवी मूल्ये जोपासली जावीत, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा हा समाजशास्त्र विषयाचा मुख्य हेतू आहे. पण, या विचाराला तडा जाईल असे उल्लेख बारावीच्या
मुंबई : समाजात मानवी मूल्ये जोपासली जावीत, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा हा समाजशास्त्र विषयाचा मुख्य हेतू आहे. पण, या विचाराला तडा जाईल असे उल्लेख बारावीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात हुंडापद्धतीविषयी आढळल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली. समाजशास्त्राच्या पुस्तकातून असे धडे विद्यार्थ्यांना कसे दिले जातात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पण आलेल्या सूचनांचा विचार केला जाईल, अशी प्रतिक्रिया शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात ‘भारतातील प्रमुख सामाजिक समस्या’ नावाचा धडा आहे. या धड्यामध्ये हुंडापद्धतीविषयी माहिती देताना भारतातील काही महिला या कुरूप असल्यामुळे त्यांच्या लग्नामध्ये अडचणी येतात. त्यामुळे हुंडा पद्धतीला वाव मिळतो, असे नमूद करण्यात आले आहे. मुलीच्या लग्नात अडचणी येत असल्यास मुलीच्या पालकांना अथवा कुटुंबीयांना मुलाच्या घरच्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे हुंडा पद्धत सुरू राहते, अशा आशयाचा हा मजकूर आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या या हलगर्जीपणाबद्दल आणि शिक्षणतज्ज्ञांनी घेतलेल्या आक्षेपानंतर शिक्षणमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिले. समाजशास्त्राच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील धड्यातील मजकुराबाबत घेतलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांच्याशी चर्चा केली. त्यांना यासंदर्भात योग्य सूचना देण्यात आल्या आहेत.
हा अभ्यासक्रमातील धड्यातील मजकूर जुना असून तो गेल्या ३ वर्षांपासून या पाठ्यपुस्तकात समाविष्ट आहे. परंतु या विषयात राजकारण आणि शैक्षणिक अभ्यासक्रम असे दोन्ही विषय एकत्रित करू नये, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
हा अभ्यासक्रमाचा विषय असून अभ्यासक्रम ठरविण्याचे काम हे अभ्यास मंडळ करीत असते. समाजातील वास्तव अशा प्रकारच्या अभ्यासक्रमातून दाखविण्याचा प्रयत्न अभ्यास मंडळाने केला असावा, असेही तावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)