‘त्या’ चिमुकल्यांना आणले शिक्षणाच्या प्रवाहात, बुलडाण्याच्या युवकांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 04:27 AM2017-10-02T04:27:29+5:302017-10-02T04:27:55+5:30
टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक चिमुकले बुलडाणा शहरात भीक मागताना आढळतात. ज्यांना दोन वेळेच्या जेवणाचीच भ्रांत पडलेली असते
बुलडाणा : टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक चिमुकले बुलडाणा शहरात भीक मागताना आढळतात. ज्यांना दोन वेळेच्या जेवणाचीच भ्रांत पडलेली असते, त्यांच्यासाठी शिक्षण फार दूरची गोष्ट. अशांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शहरातील काही युवक एकत्र आले आहेत. अशा मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.
शहरात गत काही वर्षांपासून भीक मागणाºयांमध्ये लहान मुलांची संख्या वाढत आहे. याबाबत गांभीर्याने विचार करून येथील मिलिंद चिंचोळकर व त्यांच्या सहकाºयांनी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, विदारक वास्तव समोर आले. शहराच्या आसपासच्या परिसरात अन्य गावांतून अनेक परिवार वास्तव्यास आले आहेत. यापैकी अनेकांची मुले भीक मागतात, त्यावरच कुटुंबाची गुजराण होते. अशा मुलांना शिक्षण देऊन त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न सोडविण्यासाठी चिंचोळकर, गोपाल देवकर यांच्यासह काही तरुण पुढे सरसावले. सध्या त्यांनी शहरात सपना व छकुली पवार या दोन भीक मागणाºया मुलींच्या पालकांची भेट घेऊन त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. या मुलींना पुस्तके, वह्या, गणवेश दिला आणि संपूर्ण खर्च या युवकांनी उचलला आहे. एवढेच नव्हे, तर कुटुंबीयांच्या उपजीविकेसाठी लागणारे धान्यही पालकांना पुरविण्यात येत आहे.
बुलडाण्यात अनेक मुली व मुले भीक मागत आहेत. त्यांच्या पालकांशी चिंचोळकर व त्यांच्या सहकाºयांनी संपर्क केला असून, त्यांना शिक्षण देण्यासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे. शहरात भीक मागणाºया सर्वच मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.